द्रुतगती महामार्गावर म्हशींच्या येण्याने नियमांची ऐशीतैशी!

bufflo-on-road

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील गावकरी संरक्षक जाळ्या तोडून रस्ता ओलांडातात. मात्र, अशा प्रकारांमुळे गायी-म्हशींसारखे पाळीव प्राणी आणि भटके श्वान थेट महामार्गावर येत आहेत. यातून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. वाहनांच्या धडकेत काही म्हशी आणि भटक्या श्वानांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी तोडलेल्या संरक्षक जाळ्यांची ठिकाणे शोधून ते मार्ग बंद करण्याची मोहीम महामार्ग सुरक्षा (एचएसपी) पोलिसांनी आखली आहे.

 

मुंबई महामार्गावर पोलिसांना म्हशी आणि श्वान मृतावस्थेत पडलेले दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर तपासणी केली असता, काही भागात गावकऱ्यांनी महामार्गालगतच्या लोखंडी जाळ्या तोडून अथवा सुरक्षा भिंतींनाही भगदाड पाडून मार्ग (पंक्चर) तयार केले आहेत. अवैधपणे महामार्ग ओलांडून वेळ वाचवण्यासाठी असे प्रकार सुरू आहेत. याच “पंक्चर’ मार्गांचा वापर म्हशी व श्वान करतात. हे प्राणी अचानक महामार्गावर आल्याने अपघातग्रस्त होतात. यात मनुष्यहानीचाही धोका असतो. गावकरी त्यांची दुचाकी वाहनेही “पंक्चर’मधून महामार्गावर आणतात. काही दिवसांपूर्वी खालापूर येथे जड वाहनाच्या धडकेत एक म्हैस मृत्यूमुखी पडली होती.

 

महामार्गावर म्हशी किंवा श्वान रात्रीच्या वेळी नजरेस पडत नाहीत, हे अधिक धोकादायक आहे. विशेषत: कार किंवा एसयूव्हीचालकांना अधिक धोका असतो. म्हशींचा त्रास उर्से गावाजवळ वारंवार असतो. मुंबई-पुणे कॉरिडॉरमधील परिसर झाडांमुळे हिरवागार आहे. यामुळे चरण्यासाठी म्हशी “पंक्चर’ ओलांडून महामार्गावर आणल्या जातात. खोपोली-पनवेलदरम्यान अडथळे नाहीत. किवळे ते लोणावळादरम्यान “पंक्चर’ची समस्या मोठी आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here