मुंबई (चित्रपट विभाग प्रतिनिधी गणेश तळेकर) – प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर वेब सीरीज आश्रम वेबसीरीज पुन्हा वादात सापडली आहे. या वेबसीरीजवर बंदी आणावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे. ट्विटरवर #BanAashramWebseries हा ट्रेंड सुरू आहे. या वेबसीरीजमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. आता आश्रमचे निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांना जोधपूरच्या न्यायालयाने कायदेशीर नोटिस पाठवली आहे.
बॉबी देओलने या सीरीजमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या प्रकरणी न्यायालयाने बॉबी आणि प्रकाश झा यांच्याकडे उत्तर मागितले आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी ११ जानेवारीला होईल. वेब सीरीज आश्रम विरोधात याचिका स्थानिक रहिवासी कुश खंडेलवाल यांनी दाखल केली आहे. खंडेलवालने आपल्या याचिकेत दावा केला आहे की, “बॉबी देओलच्या भूमिकेने हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. दुष्कर्मी, भ्रष्ट आणि ड्रग्जचा मोठा व्यापार करणारा बाबा निराला याची भूमिका दाखवण्यात आली आहे. हिंदू बांधवांच्या मनात संतांबद्दल ज्या भावना आहेत, त्याला धक्का पोहोचवण्याचे काम या भूमिकेने झाले आहे.”
या वेब सीरीजचा दुसरा सीझन ‘आश्रम चॅप्टर २- द डार्क साईड’ हे ११ नोव्हेंबरला रिलीज झाला होता. परंतु, यामध्ये हिंदू संतांची भूमिका वादग्रस्तपणे सादर करण्यात आली आहे. त्यामुळे सीरीजवर जोरदार टीकाही झाली होती. दुसरीकडे ट्विटरवरदेखील #BanAashramWebseries हा ट्रेंड सुरू असून नेटकऱ्यांनी आश्रम वेबसीरीज बंद करण्याची मागणी केली आहे.







