फक्त फक्त ३ हजार भारतीय सैनिकांच्या जोरावर पाकला गुडघे टेकायला लागले

vijay-diwas

नवी दिल्ली – भारतीय सैन्याने १९७१ मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे करत बांगला देशची निर्मिती केली. १३ दिवस चाललेले हे युद्ध पाकिस्तानचे जनरल नियाजी यांनी आपल्या ९३ हजार सैनिकांसह आत्मसमर्पण केल्यानंतर थांबले. १६ डिसेंबरला भारताचे मेजर जनरल जेएफआर जोसेफ यांनी नियाजींना आत्मसपर्पण करण्यास भाग पाडले. तो दिवस भारत विजय दिवस म्हणून साजरा करते. या विजय दिवसाला आज ( दि. १६ ) ५० वर्षे पूर्ण झाली आहेत.

 

या आत्मसमर्पणातील सर्वात वैशिष्ठ्यपूर्ण गोष्ट म्हणजे ज्यावेळी आत्मसमर्पणाची प्रक्रिया सुरु होती त्यावेळी भारताचे जवळपास ३ हजार सैनिक ढाक्यापासून ३० किमी अंतरावर होते. तर ढाक्याची सुरक्षा करायला पाकिस्तानकडे तब्बल २६ हजार सैनिक होते. तरीही मेजर जनरल जेकब यांनी पाकिस्तानच्या जनरल नियाजी यांना आत्मसमर्पण करायला लावले.

 

जेकब यांनी या ऐतिहासिक आत्मसमर्पणाबाबत एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले की, पाकिस्तानच्या जवळ ढाक्याची सुरक्षा करण्यासाठी जवळपास २६ हजार ४०० सैनिक होते. तर ढाक्याच्या सीमेबाहेर भारताचे फक्त ३००० सैनिक तैनात होते. आता मी हमुदुर्र रेहमान यांच्या आयोगाने दिलेल्या अहवालाचा दाखला देऊ इच्छितो. या आयोगाने जनरल नियाजी यांना हेच विचारले होते की तुमच्याकडे २६ हजार सैनिक आणि त्यांच्याकडे फक्त ३ हजार सैनिक असताना, तुम्ही ढाका अजून दोन आठवडे तरी लढता ठेऊ शकत असताना अत्मसमर्पण का केले?

 

आयोगाने, सुरक्षा परिषदेची बैठक सुरु होती तुम्ही अजून एक दिवस तरी लढला असता तर भारताला माघारी फिरावे लागले असते. तुम्ही एक लाजिरवाणे आणि विनाअट सार्वजनिक आत्मसमर्पण कसे केले. इतकेच नाही तर तुमच्या एडीएसच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिक अधिकाऱ्यांना गार्ड ऑफ ऑनर का दिला? असाही सवाल केला होता.

 

 

नियाजींनी याचे उत्तर देताना सांगितले की असं करायला मला मेजर जनरल जेकब यांनी भाग पाडले. त्यांनी मला ब्लॅकमेल केले आणि आमच्या कुटुंबियांना मारुन टाकण्याची धमकी दिली. जेकब यांनी नियाजींचा हा दावा खोटा असल्याचे सांगितले. आयोगाने नियाजी यांनाच शस्त्र खाली ठेवण्यासाठी दोषी धरले. यामुळे भारत आशियातील एक मोठी शक्ती बनला आणि नव्या बांगला देशची निर्मिती झाली.

 

दरम्यान, जेकब यांनी जनरल नियाजी यांच्याबरोबरची आत्मसमर्पणाची बोलणी कशी झाली हेही या मुलाखतीत सांगितले. यावरुन जेकब यांनी नियाजी यांच्यावर कशाप्रकारे दबाव टाकला याचा अंदाज येतो. जेकब यांनी सांगितले की, ‘फिल्ड मार्शल मानेकशॉ यांचा मला ढाक्याला जाऊन आत्मसमर्पण करुन घ्या असा फोन आला. ज्यावेळी मी ढाक्याला पोहचलो त्यावेळी पाकिस्तानी सेनेने त्यांच्या एका ब्रिगेडियरला कार घेऊन माला रिसिव्ह करण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी मुक्तवाहिनी सेना आणि पाकिस्तानी सैन्यात युद्ध अजून सुरु होते. गोळ्यांच्या फैरी झडत असल्याचा आवाज येत होता.

 

आम्ही त्या कारमधून पुढे जात असतानाच मुक्ती सेनेने त्या गाडीवर गोळ्या चालवल्या. मी त्यांना दोष देणार नाही कराण ती पाकिस्तानची गाडी होती. मी त्यावेळी हात वर करुन खाली उडी मारली. मुक्ती सेना त्या पाकिस्तानी ब्रेगेडियरला मारणार होते. आम्ही कसेबसे पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालयात पोहचलो.

 

ज्यावेळी मी नियाजी यांना आत्ससमर्पणाच्या दस्तऐवज वाचून दाखवला त्यावेळी त्यांनी तुम्हाला आम्ही आत्मसमर्पण करणार आहोत असे कोणी सांगितले. तुम्ही फक्त युद्धविराम करण्यासाठी इथे आला आहात असे सांगितले. यावरुन आमच्यात वाद झाला. मी त्यांना एका कोपऱ्यात बोलवले आणि आम्ही तुम्हाला सर्वात चांगला प्रस्ताव दिला आहे असे सांगितले.

 

आपण याच्यावर गेल्या तीन दिवसांपासून वायरलेसवर बोलत आलो आहोत. यापेक्षा चांगला प्रस्ताव आम्ही देऊ शकत नाही. आम्ही अल्पसंख्यांक आणि तुमच्या कुटुंबियांबरोबर चांगला व्यवहार आणि तुम्हाला एका सैनिकासारखी वागणूक देऊ असेही सांगितले.

 

इतके सांगूनही नियाजी तयार होत नव्हते. मी त्यांना जर तुम्ही आत्मसमर्पण कराल तर आम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ पण, तुम्ही आत्मसमर्पण केले नाही तर आम्हाला ती जबाबदारी घेता येणार नाही. यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यावेळी मी त्यांना ३० मिनिट देतो असे सांगितले. तरीही तुम्ही ऐकले नाही तर आम्हाला लढाई पुन्हा सुरु करावी लागेल असे सांगितले. मी ढाक्यावर बॉम्ब वर्षावर करण्याचे आदेश देणार असे सांगून तेथून बाहेर पडलो.

 

पण, मी मनातल्या मनात हे काय केले असा विचार करत होतो. त्यावेळी माझ्याकडे काहीही नव्हते. त्यांच्याकडे ढाक्यात २६ हजाराच्यावर सैनिक होते. तर आमचे ३ हजार सैनिक ढाक्यापासून ३० किमी दूर होते. जर त्यांनी आत्मसमर्पणास नकार दिला तर काय करणार या विचारात होतो. मी ३० मिनिटांनंतर आत गेलो. आत्मसमर्पणाचे दस्तऐवज टेबलावर पडले होते. मी त्यांना तुम्ही अत्मसमर्पणास तयार आहात का असे विचारले. त्यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. मी पुन्हा तीन वेळा त्यांना तेच विचारले. त्यानंतर मी म्हणालो की तुम्हाला आत्मसमर्पण प्रस्ताव मान्य आहे असे समजतो तो दस्तऐवज घेऊन उठलो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here