ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मराठी रंगभूमीवरील तुफान विनोदी ठरलेल्या ‘यदा कदाचित’ नाटकाचे निर्माते श्री दत्त विजय प्रॉडक्शनचे दत्ता घोसाळकर यांचे मंगळवारी मध्यरात्री ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी छाया, मुलगा, भाऊ – बहीण असा परिवार आहे. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील बोरसचे हे त्यांचे मूळ गाव. मात्र वास्तव्य ठाण्याचेच. महाराष्ट्र आणि शिवसमर्थ विद्यालयात तसेच ज्ञानसाधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. शालेय – महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी नाटकांमधून छोट्या – मोठ्या भूमिका साकारून नाटकाची आवड जोपासली. १९९३ मध्ये त्यांनी गजेंद्र अहिरे लिखित आईंचं घर उन्हाचं, या नाटकाद्वारे नाट्यसृष्टीत पदार्पण केले. यामध्ये दिवंगत अभिनेते दिलीप कुलकर्णी, अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या भूमिका होत्या. त्यानंतर त्यांनी यदा कदाचित, देहभान, लाली-लीला, मी उभा आहे, हम पांच, हाताची घडी तोंडावर अशा सुमारे २५ हून अधिक नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सध्या त्यांचे रंगभूमीवर यदा – कदाचित रिटर्न हे नाटक सुरू होते.
यंदा कदाचित नाटकाचे रंगभूमीवर सुमारे ४ हजारांहून अधिक प्रयोग झाले. त्यानंतर अलीकडच्या काळात त्यांनी यंदा कदाचित रिटर्न हे नाटक नव्याने रंगभूमीवर आणले होते. हेलन – केलरच्या जीवनावर आधारित किमयागार हे वेगळ्या विषयावरचे नाटकही त्यांनी रंगभूमीवर सादर केले. त्यांना दीनानाथ मंगेशकर व अन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना नाटकात संधी दिली. त्यांच्या नाटकातून पदार्पण करणारे अनेक कलाकार पुढे रंगभूमीवर नाव कमावले.







