धुळे (प्रतिनिधी) – धुळे शहरासह परिसरात पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा फायदा घेत चोरटे पुन्हा सक्रीय झाले आहेत. शहरातील निरनिराळ्या भागातील बँकेचे तीन एटीएम केंद्र लुटण्याचा प्रयत्न चोरटयांनी केला. परंतु, एटीएम मशिन मधील रक्कम पळवुन नेण्यात चोरट्यांचा प्रयत्न फसला. येथून परततांना चोरट्यांनी एटीएम केंद्राच्या दरवाजांचे नुकसान केले. या प्रकरणी देवपुर आणि देवपुर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाले आहेत. कुलुपबंद घरे आणि व्यापारी प्रतिष्ठाणांवर लक्ष देतांनाच चोरटयांनी बँकांच्या एटीएम केंद्रांनाही लक्ष्य केले आहे. रविवारी पहाटे शहरातील तीन ठिकाणी एटीएम केंद्रातील रक्कम चोरुन नेण्याचा प्रयत्न झाला. परंतु या तीनही ठिकाणी चोरटे यशस्वी झाले आहेत. तेव्हा संतापात परततांना चोरटयांनी एटीएम केंद्राच्या दरवाजाचे नुकसान केले.
याबाबत देवपुर आणि देवपुर पश्चिम पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गोंदुर विमानतळ रोड, तलाठी कार्यालयाजवळील एटीएम केंद्र, स्वामी नारायण केंद्राजवळ असलेले एटीएम केंद्र चोरटयांनी लक्ष्य केले. परंतु चोरटयांना यश आले नाही. एटीएम केंद्राच्या लुटीची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरिक्षक चंद्रकांत पाटील यांनी एटीएम केंद्रांची पाहणी केली. चोरटयांचा माग घेण्याचा प्रयत्न केला परंतु आज तरी पोलिसांच्या हाती काही लागले नाही.







