मुंबईत नऊ महिन्यांनंतर नाटय़रसिकांना पर्वणी

natya-prayog

मुंबई (चित्रपट विभाग प्रतिनिधी गणेश तळेकर) – नऊ महिन्यांपासून बंद असलेला व्यावसायिक रंगभूमीचा पडदा मुंबईत येत्या शनिवार- रविवारी वर जाणार आहे. 19 डिसेंबर रोजी रोजी एका लग्नाची पुढची गोष्ट आणि 20 डिसेंबर रोजी इशारों इशारों में या नाटकांचे प्रयोग सायंकाळी 4 आणि 4.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली येथे होणार आहेत. त्यामुळे इतके महिन्यांनी मुंबईकर प्रेक्षक आणि नाट्य कलाकारांमधील अंतर मिटणार आहे.

 

राज्य सरकारने 5 नोव्हेंबर रोजी सुरक्षिततेचे नियम पाळून नाटय़गृहे सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर जवळपास महिन्याभरानंतर नाटकाची नांदी पुण्यातून झाली. बालगंधर्व रंगमंदिरात 11 डिसेंबर रोजी संगीत संत तुकाराम या नाटकाच्या नांदीने व्यावसायिक रंगभूमीचा पडदा वर गेला. कलाकारांचा हुरुप, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत नाट्यगृह व्यवस्थापनाने केलेली जय्यत तयारी व मायबाप रसिकांच्या भरघोस प्रतिसादात अभिनेते संजय नार्वेकर यांना तिसरी घंटा वाजवण्याचा बहुमान मिळाला. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट चा प्रयोग पुण्यात झाला. पुणेकर प्रेक्षकांनी या नाटकाला हाऊसफुल प्रतिसाद दिला. मराठी माणूस नाटकवेडा आहे, याची प्रचीती पुन्हा एकदा आली.

 

50 टक्के प्रेक्षक क्षमतेसह नाटय़गृहे सुरू करण्यास परवानगी दिल्याने निर्मात्यांचे नुकसान होणार आहे. राज्य सरकारने नाटकांच्या वाहनांना टोलमाफी, नाटय़गृहांचे भाडेही खूप कमी केले आहे. नाटय़निर्मात्यांना दिलासा मिळाला आहे. इशारों इशारों में नाटकांत मी, संजना हिंदुपूर, उमेश जगताप आदींच्या भूमिका आहेत. नऊ महिन्यांच्या फार मोठा गॅपने परत आलोय. लाईव्ह परफॉर्मन्स ही रंगभूमीची ताकद आहे. कलाकार आणि प्रेक्षक दोघेही एन्जॉय करतात. ही देवाणघेवाण मस्त वाटतं. सुरुवातीला वाटतं होतं की लोक कसे रिएक्ट होतील. पण चित्र निश्चितच चांगले आहे. प्रेक्षकांनी खूप चांगले संकेत दिलेत. महानगरपालिका आणि राज्य सरकारने केलेल्या सहकार्यासाठी आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया अभिनेता सागर कारंडे याने दिली.

 

एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचा प्रयोग घेऊन मुंबईकर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पुण्याच्या प्रेक्षकांनी या नाटकाला खूप चांगला प्रतिसाद दिला. आम्ही आमची तयारी पूर्ण केलेय. रसिक प्रेक्षकांनी साथ द्यावी, असं मी आवाहन करतोय, असे अभिनेते प्रशांत दामले म्हणाले.

इशारों इशारों मेंच्या रविवारच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजय कासुरडे नाटकाचे निर्माता आहेत. आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत. या नाटकाचे फेब्रुवारीपर्यंत 16 प्रयोग झाले होते. नऊ महिन्यांनी नाटक सुरू करताना निर्मात्यांची तारेवरची कसरत आहे. नाटक जगायला हवंय. प्रेक्षकांनी दाद दिली पाहिजे. नाटय़गृहाची भाडे कमी झालेय, टोलमाफी झालेय. याची मदत निश्चितच आहे, असे सहनिर्माते मंदार काणे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here