नगर (प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पक्षकारामधील वाद संपुष्टात आणण्यासाठी आणि सामोपचाराने तडतोड व्हावी, याकरिता एक सकारात्मक पाऊल उचलून नगर येथील वरिष्ठस्तर न्यायाधीश सोनल एस. पाटील यांनी कोर्टाबाहेर जाऊन एका वृद्ध महिला पक्षकाराला न्याय दिला आहे.
नगर जिल्हा न्यायालयात वकील संघ व विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. येथील चौथे सहदिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात एक दिवाणी दावा प्रलंबित होता. दरम्यान, कुटुंबातीलच वाद असल्याने आपापसात तडजोड होऊन वाद विषय संपुष्टात आणावा, अशी दोन्ही पक्षकारांची तयारी झाली. त्यानुसार वादी व प्रतिवादी यांनी परस्पर संमतीने वकिलामार्फत लोक न्यायालयात सदरचे वाद प्रकरण तडजोडीसाठी ठेवले. हे प्रकरण जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमधील तिसऱया मजल्यावरील पॅनलसमोर नेमण्यात आले.
तडजोडीचा अर्ज सादर केल्यानंतर अर्जातील कथनाबाबत दोन्ही पक्षकारांची सत्यापन पडताळणी होण्यासाठी आणि खात्री करून घेण्यासाठी पक्षकाराची उपस्थिती आवश्यक होती; परंतु या दाव्यातील प्रतिवादी असलेली महिला वृद्ध व जिना चढण्यास शारीरिकदृष्टय़ा सक्षम नसल्याने तिला चारचाकी गाडीत बसवून आणल्याचे वकिलांनी पॅनलसमोर सांगितले. त्यानंतर पॅनल प्रमुख न्यायमूर्ती सोनल एस. पाटील यांनी हा पेच सोडविण्यासाठी पार्किंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
पॅनल सदस्य ऍड. अरुणा उनवणे-राशिनकर, ऍड. दीपा झांबरे, ऍड. सुनील मुंदडा यांच्यासह प्रत्यक्ष पार्ंकगमध्ये जाऊन कायद्याप्रमाणे खात्री केली आणि पक्षकाराच्या इच्छेनुसार वाद विषयामध्ये तडजोड करून दावा निकाली काढला. यावेळी ऍड. डी. एस. घोलप, ऍड. ए. एस. कोल्हे, पार्किंगमध्ये उपस्थित असलेले इतर वकील, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस आदी उपस्थित हेते. या घटनेचे विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्यायाधीश रेवती देशपांडे यांनीही कौतुक केले.







