लखनौ – वाढत्या थंडीमुळे सध्या उत्तरेकडे पहाटेचं दाट धुकं पसरत आहे. प्रत्येक वर्षी थंडीत दाट धुक्यामुळे तिथे अनेक अपघात होतात. आज उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यात एक प्रवासी बस थेट गॅस टँकरवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात 12 प्रवासी ठार झाले तर 22 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
मुरादाबाद आग्रा महामार्गावर चंदौसी जवळील धनौरी गावाजवळ हा अपघात घडला. ही बस अलीगढ डेपोमधील असून या बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करत होते. या बसचा चालक एका उसाच्या ट्रकला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्या चालकाला धुक्यामुळे ट्रकच्या पुढचा गॅस टँकर दिसला नाही. त्यामुळे तो भरधाव वेगात टँकरवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की बसची एक बाजू पूर्णपणे टँकरमध्ये घुसली. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळतीची शक्यता असल्य़ाने आजुबाजूचा परिसर सील करून खाली करण्यात आला होता.







