मुंबई (हितेश मिस्त्री) – भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर आज 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारे पहिले फलंदाज, कसोटीच्या दोन्ही डावांत तीन वेळा शतक झळकावणारे पहिले फलंदाज, 2005पर्यंत सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम त्यांच्या नावावर होता आणि कसोटीत 100 झेल टिपणारे पहिले भारतीय क्षेत्ररक्षक आदी अनेक विक्रम नावावर असलेल्या लिटिल मास्टर गावस्कर यांनी वाढदिवशी ग्रेट काम केलं आहे. गावस्कर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 35 मुलांच्या हृदयावर होणाऱ्या शस्त्रक्रीयेचा खर्च उचलला आहे.
खारघर येथे लहान मुलांच्या हृदयविकारावर उपचार करणाऱ्या श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमधील 35 मुलांच्या शस्त्रक्रीयेचा खर्च गावस्कर उचलणार आहेत. शुक्रवारी त्यांनी हॉस्पिटलला भेट दिली आणि तेथे मुलांच्या कुटुंबीयांना हे आश्वासन दिलं. गेल्या वर्षीही त्यांनी अशीच मदत केली होती. गावस्कर यांनी भारताकडून 35 शतकं झळकावताना सर डॉन ब्रॅडमन यांचा शतकांचा विक्रम मोडला होता. त्यामुळे त्यांनी 35 मुलांच्या शस्त्रक्रीयेचा खर्च उचलला आहे.
यापूर्वी कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी गावस्कर यांनी 59 लाखांचे दान केले होते. त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत 35 लाख, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 24 लाख दिले आहेत.







