नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद

nandurbar-blood-donatation

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस मुख्यालयातील गंधर्व हॉल येथे आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात काल दुपारपर्यंत 126 व्यक्तिंनी रक्तदान केले. नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे आदी उपस्थित होते.

 

यावेळी श्री. गमे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना इतर शस्त्रक्रीयांसाठी आवश्यक रक्ताचा तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे. अशावेळी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या रक्तदान शिबिरामुळे रुग्णांना आवश्यक रक्त उपलब्ध करून देणे शक्य होईल. या शिबिरात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

डॉ.भारुड म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक रक्त पिशव्यांचे संकलन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.भारुड यांनी स्वत: सकाळी रक्तदान केले. शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नागरीकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. श्री.गमे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
उप‍जिल्हाधिकारी सुधीर खांदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here