अलिबाग तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या अब की बार तीनशे पार

  • आज 23 रुग्णांनी केली कोरोनावर मात

अलिबाग-सोगावकर – तालुक्यात आज (10 जुलै) 30 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 23 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. यापैकी बहुतांश रुग्णांना आधी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांकडून तर काहींना स्थानिक संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये आज अखेर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या तीनशे च्या पुढे गेली आहे.
आज नोंद झालेल्या नवीन 30 रुग्णांमध्ये आवास, गोंधळपाडा, चेंढरे, भाल, बोरपाडा, मोठे शहापूर, पिंपळभाट, वरसोली, बहिरोळे, धेरंड, शहाबाज, श्रीबाग, पोयनाड, अलिबाग शहर, सुजलाम नगर येथील रुग्णांचा समावेश आहे. आवास गावामध्ये आज पहिला कोरोना रुग्ण नोंदवला गेला आहे. येथील 54 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर अलिबाग बाजारपेठेतील 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गोंधळपाडा येथील 27 वर्षीय तरुणाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. चेंढरेतील रोहिदास नगर येथील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या 51 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर चेंढरेतील एमआयडीसी ऑफिस परिसरातील आदित्य सोसायटी येथील 22 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे.
बोरपाडामध्ये चार रुग्णांची नोंद झाली आहे. येथील 52 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी, 31 वर्षीय महिला आणि 56 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सुजलाम नगर-अलिबाग येथील 42 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. तसेच सुजलाम नगर येथील कृष्णदर्शन सोसायटीमध्ये राहणार्‍या 26 वर्षीय तरुणालाही कोरोनाची लागण झाली आहे. भाल येथील 8 वर्षीय मुलीला कोरोना झाला आहे. तर वैभवनगर-चेंढरे येथे आणखी एक रुग्ण आढळला असून, 48 वर्षीय व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.
मोठे शहापूरमध्ये 16 वर्षीय मुलगी आणि 30 वर्षीय महिला अशा दोघांना कोरोना झाला आहे. शिवाजीनगर येथील शिवकृपा बिल्डींगमध्ये राहणार्‍या 48 वर्षीय महिला व 27 वर्षीय तरुणी अशा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पिंपळभाट येथील सुशिल नगरमधील 58 वर्षीय व्यक्ती, बहिरोळे येथील 62 वर्षीय महिला, चेंढरे पाटील वाडी येथील 23 वर्षीय तरुणी, धेरंड येथील 29 वर्षीय महिला, श्रीबाग नं. 2 (अलिबाग) येथील 49 वर्षीय व्यक्ती, सुभाषनगर पोयनाड येथील 52 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे.
वरसोलीमध्ये आज पुन्हा 5 रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ माजली आहे. वरसोली कोळीवाडा येथील 35 वर्षीय व्यक्तीला तसेच ओमकार फ्रेंड्स सर्कल-वरसोली येथील 48 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुण आणि 11 वर्षीय मुलगी यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. शहाबाज येथे दोन रुग्णांची नोंद झाली असून, 30 वर्षीय आणि 28 वर्षीय महिला अशा दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
अलिबागकरांसाठी महत्वाची म्हणजे दिलासा देणारी बाब म्हणजे, 23 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यात कुरुळ आदर्शनगर येथील 1, खारीकपाडा-बामणगाव येथील 1, मोठे शहापूर 1, ब्राह्मणआळी सिद्धेश सोसायटी-अलिबाग येथील 1, सिव्हील हॉस्पिटल वसाहत अलिबाग 1, आंबेपूर येथील 8, मोठे शहापूर येथील 9, चेंढरे कृष्णवाटीका 1 अशा 23 जणांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.
दरम्यान, तालुक्यात आज नोंद झालेल्या 30 नवीन रुग्णांमुळे बाधित रुग्णांची संख्या 312 वर पोहोचली आहे. यापैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 133 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 171 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे तहसीलदार शेजाळ यांनी सांगितले.
याबद्दल नागरिकांना प्रतिक्रिया विचारली असता,समीर पालकर यांनी सांगितले की,आज आलेल्या रुग्णामध्ये लहान मुले व तरुण वर्ग यांचा समावेश अधिक प्रमाणात दिसून येत आहेत,अजूनही बऱ्याच प्रमाणात तरुण मंडळी मास्क, सोशल डिस्टनसिंग पाळत नाहीत,सकाळ संध्याकाळ मोकळेपणाने फेरफटका मारताना घ्यावयाची काळजी घेतांना दिसत नाही,याबाबत समीर पालकर यांनी चिंता व्यक्त केली आहे,तसेच अलिबाग येथील गृहिणी सौ पूजा राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,शासनाने याबाबत कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, जाणून बुजून मास्क न वापरता, आपल्या घरात, समाजात कोरोना महामारी पसरवण्यात हातभार लावला जातो आहे, अश्या हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सौ पूजा राऊत यांनी आमच्या प्रतिनिधी मार्फत संबंधित प्रशासनाला केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here