ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी गांजाच्या तस्कारीत तीन जणांना अटक केली. यामध्ये एका अभियंता तरुणाचा समावेश आढळून आला आहे.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गांजा विक्री होत असल्याने पोलिसांनी पाळत ठेवून एका तरुणाला अटक केली. या तरुणाची माहिती घेतल्यानंतर त्याने आपण जळगावहून गांजा आणत होतो असे पोलिसांना सांगितले. रोशन पाटील असे अभियंता असलेल्या तरुणाचे नाव आहे. रोशन हा जळगाव जिल्ह्यातील पारोळ तालुक्यातून कल्याण येथे आला होता.
पोलिसांनी पाळत ठेवून त्याला अटक केली होती. त्याच्याकडून पावणेदोन किलो वजनाचा २७ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. जळगावमध्ये राहणाऱ्या उषा पाटील, अशोक कंजर यांच्याकडून या वस्तू आपण घेत होतो, असे रोशनने पोलिसांना सांगितले.
रोशनने दिलेल्या माहितीप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बनकर, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांचे पथक जळगाव येथे गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी गेले. कंजर, उषाला अटक केल्यानंतर कंजर हा मोठा गांजाचा तस्कर असल्याचे पुढे आले. यापूर्वी त्याने १६६ किलो गांजाची, गावठी दारूची विक्री के ली आहे. त्याच्यावर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले. काही महिन्यांपासून कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गांजाची विक्री वाढली होती. या विक्रीमागे कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत. हा गांजा कोण खरेदी करीत होते, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.







