ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – थंडीचा मोसम सुरू होताच चिकन आणि अंडीची मागणी काही दिवसांपूर्वी वाढली होती. मात्र मार्गशीष महिना सुरू होताच आता चिकन आणि अंडीच्या मागणीत पुन्हा घट झाली आहे. त्याचा परिणाम चिकन आणि अंडीच्या दरांवर झाला असून अंडी ५० पैशांनी, ब्रॉयलर कोंबडी १० रुपये तर, गावठी कोंबडी ९० रुपयांनी स्वस्त झाली आहे. मार्गशीर्षच्या उपवासामुळे मांसाहाराचे दर घसरल्याचे चित्र आहे.
दरवर्षी थंडीच्या काळात चिकन आणि अंडय़ांची मागणी वाढल्याने दरात वाढ होते. मात्र मार्गशीष महिना सुरू होताच हे दर पुन्हा कमी होतात. यंदाही असेच काहीसे शहरात चित्र आहे. मार्गशीष सुरू होताच गेल्या आठवडय़ात अंडय़ाचे दर ५० पैशांनी कमी झाले आहेत. यापूर्वी एक अंडे ६ ्नरुपयांना मिळत होते. आता एक अंडे ५.५० रुपयांना विकले जात आहे. आठवडय़ापूर्वी ब्रॉयलर कोंबडीची किंमत १५० रुपये प्रति किलो होती, ती आता १४० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. तसेच यापूर्वी गावठी कोंबडी २७० रुपये प्रति किलो दराने विकली जात होती, ती आता १८० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. ब्रॉयलर कोंबडीच्या दरात १० रुपये तर गावठी कोंबडीच्या दरात ९० रुपयांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.







