नगर (प्रतिनिधी) – नगर अर्बन बँकेची तीन कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपाचे माजी खासदार तथा बँकेचे माजी चेअरमन दिलीप गांधी, तत्कालीन शाखा अधिकारी घनशाम अच्च्युत बल्लाळ, कर्जदार आशुतोष सतिश लांडगे आणि इतर संचालक मंडळाविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे शाखा अधिकारी मारूती रंगनाथ औटी (वय- 45 रा. पाईपालाईन रोड, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
शाखा अधिकारी औटी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की 7 ऑक्टोबर 2017 ते 10 डिसेंबर 2020 या दरम्यान बँकेचे माजी चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी (रा. देवेंद्र बंगला, आनंदऋषी मार्ग, अहमदनगर), मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्याम अच्युत बल्लाळ (रा. अर्बन बँक कॉलनी, सावेडी, नगर), कर्जदार मे. टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीचे आशुतोष सतिष लांडगे (रा. वेदांतनगर, सावेडी, नगर) आणि संचालक मंडळ सदस्य यांनी कट रचुन, संगनमत करुन, बँकेस खोटे कागदपत्र तयार करुन बँकेच्या तीन कोटी रूपयांच्या रकमेचा अपहार करुन ठेवीदार, सभासद यांचा विश्वासघात केलेला आहे.
सदर तीन कोटी रूपयांची रक्कम आर. बी कासार, मे. देवी एजन्सी व मे. गिरीराल एंटरप्राइजेस, संगमनेर यांच्या खात्यात वर्ग करुन त्यांच्या खात्याद्वारे काढून घेवून बँकेची तीन कोटी रूपयांची फसवणूक केली आहे. आरोपींनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करुन अवास्तव व खोटे कर्ज मंजूर केलेले आहे. त्याद्वारे बँकेच्या रकमेची चोरी, अफरातर व फसवणुक केली आहे. फिर्यादीवरून भादवि कलम 406, 420, 465, 467, 471 व 120 ब प्रमाणे सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे करत आहेत.







