नाशिक (विशेष प्रतिनिधी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी काल (दि. २२) केला. नाशिक आणि धुळे येथील भाजपच्या पदाधिका-यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवन येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खा. राऊत बोलत होते.
राऊत म्हणाले की, आमचा एकही आमदार फुटणार नाही असं विरोधक म्हणत आहे. पण थोडे दिवस थांबा, काय काय होतंय दिसेल. भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्या भूकंपाचं केंद्रबिंदू शिवेसेनाभवन असेल, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले की, अनेक पक्षाचे कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. आगामी काळात एकाच पक्षातून इनकमिंग होणार आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व तीन पक्षाच्या नेत्यांनी करायचं ठरवलं आहे. नाशिक आणि धुळे ही महत्त्वाची शहरं आहेत. नाशिक कायम सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. नाशिकच्या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे, असंही ते म्हणाले.







