मुंबई (हितेश मिस्त्री) – कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना कोरोनाच्या उपचारात पाण्याची वाफ घेतल्यास रुग्णांना फायदा होत असल्याचा विश्वास ऑर्किड कॅन्सर ट्रस्टकडून व्यक्त करण्यात आला. कोरोनावर लस किंवा ठोस उपचार नसल्याने सध्या रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढविण्यावर डॉक्टरांकडून भर देण्यात येत आहे. त्यासाठी अॅलोपॅथीतील हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, होमिओपॅथीतील अर्सेनिक अॅल्बम अशा गोळ्यांनी उपचार होत असताना वाफेमुळेही फायदा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्टीम थेरपीचा उपचार रुग्णांवर करण्यासाठी मुंबई पालिकेला विचारणा करण्यात आली, मात्र त्यांच्याकडून काही उत्तर न मिळाल्याने डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली.
कोरोनापूर्वी आलेल्या स्वाईन फ्ल्यू तसेच सार्स सारख्या आजारात वाफेने फायदा होत असल्याचे डॉ. दिलीप भोसले व डॉ. ऋषी भल्ला यांनी निरीक्षण केले. त्यात दुबईहून आलेल्या काही नागरिकांना कोरोनाची लक्षणे असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्या रुग्णांना वाफ घेण्यास सुचविले. दोन दिवसात याची लक्षणे दिसणे बंद झाल्याचे रुग्णांकडून त्याना सांगण्यात आले. त्यानंतर वाफेचा फायदा होऊ शकतो यावर त्यांचा विश्वास बसल्याने त्यांनी कोरोनासाठी काळजी घेण्यासोबत वाफ घेण्यास सुचविले. त्यानंतर ऑर्किड कॅन्सर ट्रस्टकडून त्यांनी रुग्णालये,पोलिस ठाणे, रुग्ण आणि कोरोनाचा संसर्ग असलेल्या विभागात वाफेच्या मशीनचे वाटप सुरू केले. मात्र या थेरपीचा उपचार रुग्णांनाही व्हावा यासाठी पालिकेकडे परवानगी मागितली आहे, मात्र अजूनही परवानगी प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले.







