मुंबई (हितेश मिस्त्री) – ‘नेपोटिझम’ वरून आरोप-प्रत्यारोप अद्याप सुरूच आहेत. याबाबत सर्वात आधी आवाज उठवला तो कंगना रणौतने. भट्ट कॅम्पच्या ‘गँगस्टर’मधून कंगनाने पदार्पण केले होते. दिग्दर्शक अनुराग बासू याने तिचे अभिनयगुण ओळखून तिला संधी दिली होती. याबाबत महेश भट्ट यांची अभिनेत्री कन्या पूजा भट्टने एक ट्विट करून ज्या भट्ट कुटुंबावर कंगना नेपोटिझमचा आरोप करीत आहे त्यांनीच तिला चित्रपटसृष्टीत पहिली संधी दिली होती असे म्हटले होते. आता कंगनाने आपल्या टीमच्या ट्विटर हँडलवरून तिला प्रत्युत्तर दिले असून पूजाने वडिलांना ‘हे’ काही प्रश्न विचारावेत असे सुनावले आहे!
कंगनाच्या टीमने ट्विटमध्ये म्हटले आहे की कंगनाची प्रतिभा अनुराग बासू यांनी ओळखली होती. मुकेश भट्ट (महेश भट्ट यांचे निर्माते बंधू) यांना कलाकारांना पैसे देणे आवडत नाही. अनेक स्टुडिओ प्रतिभावान कलाकार त्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा उपकार करीत असतात. त्यामुळे तुझे वडील महेश भट्ट यांना कंगनावर चप्पल फेकण्याचा, तिला वेडी म्हणण्याचा किंवा तिचा अपमान करण्याचा अधिकार नाही. त्यांनी तिला ‘दुःखद शेवट’ असेही म्हणून हिणवले होते. त्यांनी सुशांत सिंह राजपूत आणि रिया यांच्या नात्यात नको तितका रस का घेतला? त्यांनी त्याच्याही शेवटावर का वक्तव्य केले? यासारखे काही प्रश्न तू त्यांना जाऊन विचार. कंगनाने ‘गँगस्टर’बरोबरच ‘पोकिरी’ या चित्रपटासाठीही ऑडिशन दिली होती व त्यामध्येही तिची निवड झाली होती. ‘पोकिरी’हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. त्यामुळे ती आज ज्या स्थानावर आहे ते तिला ‘गँगस्टर’ मुळेच मिळाले असा समज करून घेऊ नको. पाण्याचा प्रवाह आपला मार्ग स्वतःच शोधतो, तो कुणी रोखू शकत नाही, असे कंगनाच्या टीमच्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे. कंगनाला दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूबरोबर ‘पोकिरी’ या चित्रपटाची ऑफर मिळाली होती; पण तिने अनुराग बासूच्या ‘गँगस्टर’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याचे ठरवले व ‘पोकिरी’ स्वीकारला नव्हता. त्यामुळे इलियाना डिक्रुज या चित्रपटाची नायिका बनली.







