रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – तरसोद जि.प.उच्च प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे यांना महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे व ग्रामपंचायत टेंभे तालुका बागलाण यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव येथील आय.ए.म.ए.हॉलमध्ये संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेत दि.२० डिसेंबर २०२० रोजी राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार अंतर्गत स्मृतिचिन्ह,मानपत्र,शाल देऊन नेहरू युवा केंद्राचे संचालक अतुल निकम ( कर्नाटक ) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
परिषदेच्या अध्यक्षस्थानी जलदुत तथा मराठी विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे, सटाणा नगराध्यक्ष सुनील मोरे ,आदर्श गाव सरपंच भाऊसाहेब रवींद्र अहिरे, निसर्ग मित्र समितीचे राज्य अध्यक्ष डी.आर.पाटील ,संगमनेर शहर नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे,निसर्गमित्र समितीचे राज्याध्यक्ष डि. आर.पाटील,निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे,धुळे जिल्हा अध्यक्ष डी.बी.पाटील मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते .
बीजारोपण ,वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन,फटाके मुक्त अभियान, प्रदुषणमुक्त सार्वजनिक होळी,शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने पर्यावरण दिन साजरे करणे,ग्रामस्वच्छता अभियान,प्लास्टिक मुक्ती अभियान, महिला बचत गटांना मार्गदर्शन,कोविड महामारी काळात स्थलांतरीत मजूरांना अन्नदान तसेच विद्यार्थी व सफाई कामगार महिलांना मास्क व सॅनेटाईझर वाटप,अंधश्रद्धा निर्मूलन,मरणोत्तर नेत्रदान व देहदान बाबत समाज प्रबोधन,लोकसहभागातून शाळांना चरित्रात्मक पुस्तके भेट,वाचन संस्कृती चळवळ,पुस्तक भिशी उपक्रम, गावोगावी समाज सुधारकांच्या परिवर्तनवादी विचारांचे भित्तीलेखनातून विचार जागर अभियान कार्यासह आदिवासी पाड्यांवर निराधार बालकांना दिवाळी फराळ,कपडे वाटप,गुणवंतांना सन्मानित करणे,डॉक्टर्स डे,वयोवृद्ध दिन कार्यक्रमान्वये सत्कार, लोकसहभागातून आपदग्रस्त निधी उभारुन मुख्यमंत्री मदतनिधिला देणे आदी पर्यावरणीय,सामाजिक,शैक्षणिक व राष्ट्रीय उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन निसर्ग समितीने लुल्हे यांचा गौरव केला.यापूर्वी लुल्हे यांना सहा राज्यस्तरीय व सहा जिल्हास्तरीय पुरस्कारांसह रौप्यपदके प्राप्त झाली आहेत.अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दल त्यांचा शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या हस्ते शतकवीर पुरस्काराने गौरव झाला आहे .पुरस्कार प्राप्त झाल्या प्रित्यर्थ लुल्हे यांचे सर्व स्तरातून मान्यवरांतर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .







