सुवर्णमयी नटसम्राट नाट्यअभिवाचनाने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

Suvarnmai-natsamrat

मू.जे.महाविद्यालयाच्या साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाचे उद्‌घाटन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या मूळजी जेठा महाविद्यालयाच्या साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाचे उद्‌घाटन आज (दि.२३) सायंकाळी ६ वाजता महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळेस नटसम्राट या नाटकाला रंगभूमीवर येण्यास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुवर्णमयी नटसम्राट या नाट्यअभिवाचनाचा प्रयोग सादर करण्यात आला.

 

उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.सी.ई.सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाहीर विनोद ढगे, संस्कारभारतीचे मोहनत रावतोळे व ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर डॉ.भाग्यश्री भलवतकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उद्‌घाटनपर मनोगतात बोलताना शाहीर विनोद ढगे म्हणाले की, सांस्कृतिक चळवळ वृध्दींगत होण्याकरिता मूळजी जेठा महाविद्यालयाचे मोठे योगदान असून, आता साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून ही चळवळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यास निश्चितच बळ मिळेल. पथनाट्य, लोककला व नाट्यकला यांच्या संवर्धनासाठी जळगावातील रंगकर्मींना माझे नेहमीच सहकार्य राहिल.deep-prajvalan

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शशिकांत वडोदकर यांनी सांगितले की, जळगावच्या सांस्कृतिक चळवळीत प्रोत्साहन देण्यासोबतच सांस्कृतिक कार्यासाठी येणाऱ्या उणीवा, समस्या, अडचणी यावर मात करण्यासाठी नाट्यकर्मींच्या पाठीशी के.सी.ई सोसायटी भक्कमपणे उभी आहे असे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्यावतीने उपस्थितांना आश्वासित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोपीचंद धनगर यांनी तर आभार डॉ.विलास धनवे यांनी मानले.

सुवर्णमयी नटसम्राट अभिवाचनाने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

प्रत्येक नटाला खुणावणारे सुवर्णस्वप्न म्हणजे नटसम्राट हे नाटक ओळखले जाते. २३ डिसेंबर १९७० रोजी धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, मा.वि. वा. शिरवाडकर लिखित व मा.पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर .सतीश दुभाषी, .उपेंद्र दाते, .यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे , नाना पाटेकर यांनी नटसम्राट मधील अप्पासाहेब बेलवलकर रंगवले आहेत. आज (दि.२३) नटसम्राट या नाटकाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मूळजी जेठा महाविद्यालयाचे कला, साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ आणि खान्देश नाट्य प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व संस्कार भारती, जळगाव निर्मित सुवर्णमयी नटसम्राट या नाट्य अभिवाचनाचे सादरीकरण मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात करण्यात आले.

 

गणेश सोनार (अप्पासाहेब) आणि सौ.प्रतिमा याज्ञिक (सरकार) यांनी साकारलेल्या वाचिक अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विशेषतः नटसम्राटमधील गणेश सोनार यांनी वाचलेल्या स्वगताना प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. त्यांच्यासोबत नाट्यअभिवाचनात दिपक महाजन, हेमलता चौधरी, नेहा पवार, संस्कृती पवनीकर, अमोल ठाकूर, चंद्रकांत चौधरी, विकास वाघ आदी कलावंतांचा सहभाग होता. या नाट्यअभिवाचनाचे दिग्दर्शक चिंतामण पाटील हे होते तर तांत्रिक बाजूंमध्ये प्रकाशयोजना पियुष रावळ, संगीत दर्शन गुजराथी, रंगमंच व्यवस्था दिनेश माळी, कपिल शिंगाणे, देवेंद्र गुरव, सिध्दांत सोनवणे,उमेश सोनवणे आणि नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थ्यांची होती. अभिवाचनासाठी नाट्यशास्त्र विभागप्रमुख हेमंत पाटील यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here