सातारा येथील बालाजी जाधव यांना प्रयोगशील शिक्षणाबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कार

balaji-jadhav-satara

सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – लॉकडाऊनच्या काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी अभिनव मार्ग शोधणारे बालाजी जाधव हे साताऱ्यातील शिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.बालाजी जाधव यांनी लॉकडाऊनच्या काळात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी केलेल्या कॉन्फरन्स कॉलद्वारे शिक्षणाच्या प्रयोगाची दखल ‘हनी बी नेटवर्क’ व ‘गियान’ या संस्थांनी घेतली आहे.

बालाजी जाधव हे विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्यांनी करोना लॉकडाऊनमध्येही मुलांना शिक्षणापासून वंचित राहू दिले नाही. त्यांच्या शाळेत ४० विद्यार्थी शिकतात. आई-वडिलांकडे स्मार्टफोन नसल्याने जाधव यांनी कॉन्फरन्स कॉल माध्यमातून एकावेळी दहा विद्यार्थी याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवले. मुलांना सहज आकलन होण्यासाठी गोष्टींचा वापर केला. मोठय़ा मुलांना रोज सांगितलेल्या गोष्टी लिहिण्यास सांगण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव झाला. जाधव यांनी आठ महिने हा उपक्रम राबवून सर्वच विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी शेजारच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही मदत केली. या अभिनव कार्यासाठी त्यांना २४ डिसेंबरला एचबीएन क्रिएटीव्हिटी अँड एक्सलुजिव्ह अ‍ॅवॉर्डस पुरस्कारा जाहीर झाला. त्यांच्यासह देशभरातील आणखी दहा शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला.
हनीबी नेटवर्क व गियान या दोन संस्थांनी शिक्षणातील प्रयोगशीलता, नवप्रवर्तन यासाठी हा पुरस्कार ठेवला होता त्यात पारंपरिक ज्ञान पद्धतीतील रोजचे अडथळे दूर करणाऱ्या शिक्षकांचा विचार करण्यात आला. एकूण ८७ देशांतून २५०० प्रवेशिका आल्या होत्या. त्यात नऊ देशांतील ११ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here