सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात गाढवे घुसवण्याचा प्रयत्न

satara-collector-office

सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – जिल्हा महसूल विभागाने खाणकामाचे परवाने द्यावेत, वाळू व्यवसायास परवानगी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा वडार समाजाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढवांसह धडक मोर्चा काढला. प्रशासनाला जागे करण्यासाठी पन्नासहून अधिक आणलेली गाढवेकार्यालयाच्या आवारात सोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांसोबत आंदोलनकर्त्यांची शाब्दिक चकमक झाली. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला.

दगड खाणकाम करणे हा वडार समजाचा पिढीजात व्यवसाय आहे. मात्र, जिल्हा महसूल विभागाने सरसकट जिल्ह्यातील सरकारी हद्दीतील खाणी बंद केल्या. त्यामुळे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन हिरावल्यामुळे वडार समाजात जिल्हा प्रशासनाविरोधात असंतोष निर्माण झाला होता. खाणी सुरु व्हाव्यात यासाठी वडार समाजाकडून शासन-प्रशासन दरबारी विनंतीअर्ज, निवेदने दिली जात होती. मात्र त्यांच्या मागण्यांची, भावनांची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाविरोधात वडार समाजामध्ये असंतोषाची भावना वाढीस लागली. वडार समाज बांधवांनी प्रमुख मागण्यांसाठी एल्गार पुकारला.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढवांसोबत धडक दिली. आंदोलक आणि पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. गाढवे आणण्यास पोलिसांनी हरकत घेतल्याने आंदोलक आक्रमक झाले. वडार समाजाने मुख्य प्रवेशद्वारावर गावढे जमवून जिल्हाधिकारी कार्यालयात ती सोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी प्रवेशद्वार लावून घेतले. यावेळी वडार समाज बांधवांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत घोषणा बाजी केली. नाही कुणाच्या बापचे आहे आमच्या हक्काचे, वडार समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, जय बजरंग जय वडार आदि घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. वाळू, खाणी बंद केल्या. बेरोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंपरेने हक्काचा व्यवसाय आहे. अधिकार्‍यांच्या चुलीवरील भाकरी मागतोय का? स्वराज्याच्या राजधानीत गरीबांवर अन्याय होत आहे. वडार समाजावर उपासमारीची वेळ आली त्याला शासन व प्रशासन जबाबदार आहे. आधुनिक युगात वडार समाज हातफोडीने खाणकाम व्यवसाय करत आहे. रस्ते, किल्ले, इमारती, मंदिरे वडार समाजाने बांधली. व्यवसाय बंद केल्याने बेरोजगारी वाढली आहे.

प्रत्येक समाज व्यवसाय जपत आहे. खाजगी मालकांना परवानगी मात्र वडार समाजावर अन्याय का? पारंपरिक व्यवसाय करण्यास अडचणी का आणता? असा सवाल समाज बांधवांनी केला. यावेळी दिपक नलावडे, रमेश विटकर, संदीप पिसाळ, किरण नलवडे, उज्ज्वला निंबाळकर, दिपाली नलवडे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here