(ॲड. जीवनदत्त आरगडे)
दुचाकीचा चालक नको का… दुचाकीला सुद्धा चालक असतो, फक्त चालक आणि. मागे बसलेला प्रवाशी असतो..आपल्या आदेशात सुधारणा करा..आपण फोन रिसिव्ह करीत नाहीत म्हणून..आपणास सोशल मीडियावर लिहावे लागत आहे..आपणास मी खालील पत्र आपल्या व्हॉट्स ऍप क्रमांकावर पाठवले आहे…ते आपण पाहत नाहीत म्हणून आम्हाला अशा प्रकारे सोशल मीडियावर आर्त आकाशवाणी करावी लागत आहे…
सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब,
आपण आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 या कायद्याद्वारे आपणास प्राप्त झालेल्या अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या अधिकारात दिनांक 05/07/2020 रोजी काढलेला आदेश त्यापैकी दुचाकी वाहनावर एक पेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करू शकत नाही हा दिलेला आदेश जाचक अव्यवहार्य आणि आगंतुक असून हा आदेश या आदेशाचे पालन करणे तसेच अंमलबजावणी करणे प्रत्यक्षात शक्य होत नाही असे दिसत आहे. म्हणूनच आदेश आदेशित झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर दंडात्मक कार्यवाही झाल्याचे दिसून येते. यामध्ये खालील बाबींचा विचार न करता आपण हा आदेश पारित केलेला आहे. त्या काही बाबी आपणास निदर्शनास आणून देऊ इच्छितो की,
१. दुचाकी न चालवता येणाऱ्या व चारचाकी न परवडणाऱ्या व्यक्तीनी आरोग्याशी निगडीत उपचारासाठी किंवा इतर आवश्यक अपरिहार्य कार्यासाठी प्रवास कसा करावा.
२.अपंग वयोवृद्ध व्यक्ती तसेच बहुतेक महिला यांना दुचाकी वाहन चालवता येत नाही अशा व्यक्तींना दुचाकी वाहनाना चालक आवश्यक असतो. त्यांनी चालकाशिवाय कसा प्रवास करायचा. ज्यांच्याकडे दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना नाही अशा व्यक्तीने प्रवास कसा करावा
३. त्याचबरोबर चार पत्र्याच्या अतिशय छोट्या घरात एकत्र राहणारे कुटुंबातील सदस्य हे आई वडील पत्नी मुले भाऊ बहीण हे घरात एकत्र राहतात तेच जर दुचाकी वाहन यावर प्रवास करीत असतील तर त्यांना जो प्रादुर्भाव होण्याचा धोका गाडीवर प्रवास करताना आहे तोच घरी एकत्रित राहण्यात आहे. अर्थात त्यांना घरी सुरक्षित सोबत राहणारी असुरक्षित किंवा आपत्कालीन प्रसंगात सोबत राहू शकत नाही असा होतो त्यामुळे त्या व्यक्ती दुचाकी वाहन फक्त चालक चालवेल हा नियम आगंतुक आहे. कारण जी व्यक्ती घरात सोबत असते कुटुंबाचा सदस्य म्हणून तीच व्यक्ती गाडीवर मागे बसली की प्रादुर्भाव वाढतो असे म्हणता येणार नाही.
४.सार्वजनिक वाहतूक किंवा कसल्याही प्रकारची वाहतूक सुरू नाही अशा वेळेत तीन चाकी किंवा चारचाकी वाहन सर्वांना परवडेल असे नाही त्यामुळे आपल्या त्या आदेशातील दुचाकी वाहन बाबत केलेला आदेश मध्ये आपण कुटुंबातील सदस्य, अपंग ,वयोवृद्ध किंवा वाहन चालवण्याचा परवाना नसणारी व्यक्ती यांना दुचाकी वाहन यावर प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत सुधारित आदेश करावा. ही विनंती
५. आपण केलेल्या आदेशामुळे सरळ सरळ ज्यांच्याकडे वाहन नाही , वाहन चालविण्याचा परवाना नाही, किंवा वाहन चालवणे शारीरिक दृष्ट्या शक्य नाही , किंवा वाहन चालवता येत नाही किंवा वाहनांमध्ये पेट्रोल साठी पैसे नाहीत अशा व्यक्तींना चक्क संचार स्वातंत्र्य नाकारले आहे. आणि ज्यांच्याकडे स्वतः चे वाहन आहे त्यांना मात्र प्रवास करण्याचा अधिकार आहे. हा नियम जाचक ठरत असून प्रत्यक्षात पालन करणे खूप जिकिरीचे होत आहे. त्यामुळे कित्येक रुग्ण यांना दवाखान्यात सध्या तपासणीला घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण त्यांना उपचाराचा सुद्धा अधिकार हिरावून घेतला आहे.काही वैद्यकीय सेवेतील परिचारिका डॉक्टर यांना सुद्धा वाहन चालवत येत नाही. त्यांना यामुळे मोठ्याप्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे आपल्या आदेशात दुरुस्ती करावी. आगोदर नागरिक लॉक डाऊन मुळे आर्थिक संकटे आणि विवंचनेचा सामना करीत आहेत, त्यामुळे जगणे असह्य झालेले आहे,
त्यात आपण काढलेला हा नियम म्हणजे नियमांचा अतिरेक ठरत आहे , एकाच घरातील व्यक्ती दुचाकीवर बाहेर फिरली दुचाकीवर मागे बसून तर त्यात प्रादुर्भाव कसा वाढतो, जो व्यक्ती वाहन घेऊन बाहेर जातो तो व्यक्ती काही फेरफटका मारायला जात नाही काही तरी वस्तू खरेदी करायला जातो त्यावेळी त्या वस्तू मागे घेऊन बसायला व्यक्ती नसेल तर त्याला त्या वस्तू सुद्धा नेता येत नाहीत, याचा विचार आपण हा नियम करताना करणे गरजेचे होते. कोणताही नियम किंवा कायदा करताना लोकेच्छा Public Will आणि वस्तुस्थिती Situation विचारात घ्यावी लागते. यात आपण दोन्ही बाबी दुर्लक्षित केलेल्या आहेत.
काही रुग्ण वाहन न मिळाल्याने , काही नागरिक साप चावला, विंचू चावला, किंवा बैलाने मारले अथवा, अपघात झाला आणि आपण काढलेल्या नियमामुळे त्याला दुचाकी वाहनावर स्वतः बाहेर पडता आले नाही आणि मागे बसून जाता आले नाही तर त्याने नेमके काय करायचे. यापुढे अशा काही घटना घडल्या आणि त्यात कोणाचा जीव गमावला तर त्यास आपणास जबाबदार धरले जाईल. आपत्ती व्यवस्थापन कायद्याने आपणास दिलेल्या अधिकाराने लोकांना जीवंत ठेवावे यासाठी अधिकार दिलेले आहेत , आपल्या असल्या जाचक नियमाने लोक मेले तर आपणाविरुद्ध न्यायालयीन लढाई आम्हाला लढावी लागणार आहे. त्यामध्ये होणाऱ्या नुकसानीस आपण जबाबदार राहणार आहात, आपण तात्काळ या नियमात दुरुस्ती करावी आणि सुधारित आदेश करावा. ही आपणास जनतेच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती. आपण फार कर्तव्य दक्ष अधिकारी आहात त्यामुळे आपण कोणाचाच फोन रिसिव्ह करीत नाहीत त्यामुळे आपणास लोकांचे म्हणणे समजत नाही त्यामुळे असे घडते, फारच व्यस्त असाल तर किमान तंत्रज्ञानाने संवादासाठी दिलेल्या दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी यांचा वापर आपल्या देश सेवेच्या कार्यात करावा. नरेंद्र मोदी , शरद पवार, महसूल मंत्री हे सगळे फोन स्वीकारतात आपण कोणाचाच फोन स्वीकारत नाहीत, आपले हे वागणे बरे नव्हे, आपण सध्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहात मात्र आपत्ती काळात आपण जनता किंवा लोकप्रतिनिधी पक्ष संघटना संस्था अशांचे फोन रिसिव्ह करून परिस्थिती समजून घेण्याची सद्बुद्धी आपणास ईश्वर देवो किंवा तात्काळ तुमची दुसऱ्या निर्मनुष्य जिल्ह्यात एखाद्या निर्जन बेटावर बदली होवो अशी सिद्ध रामेश्वर चरणी प्रार्थना, आमचे तहसीलदार तर तुमचा सुद्धा फोन घेत असतील की नाही याबाबत शंका आहे. आपण जबाबदार अधिकारी आहात.आपत्कालीन काळात फोन स्वीकारत जा किंवा किमान आलेल्या संदेशाचे वाचन करून प्रतिक्रिया देत जा. जिल्हाधिकारी आहात म्हणजे कागदात डोके खुपसून लोकांशी विसंवाद करावा असे नव्हे. ही आपणास माझी सूचना आहे विनंती नव्हे. मागे गुळपोळी गावात एका व्यक्तीने चक्क तलावाचा भराव फोडला याबाबत कित्येकांनी आपणास मेसेज दिले अशा एकही मेसेज चे उत्तर आपण दिलेले नाही. हे आपले वर्तन बदलले नाही तर तुम्ही कृपा करून स्वतः निवृत्ती घ्या. आणि घरी बसले तरी किमान दुसरा सक्षम अधिकारी आपल्या ठिकाणी कार्यरत होऊ शकेल. हे पत्र मी मा. महसूल मंत्री विजय उर्फ बाळासाहेब थोरात साहेब या तसेच मुख्यमंत्री यांना पाठवत आहे. आपण अशा काळात तत्पर राहणे अपेक्षित आहे. ही विनंती.मी आपणास यापूर्वी कित्येक वेळा फोन केला आहे , कार्यालयातील फोन वर सुद्धा आपण फोन घेत नाहीत. कदाचित कामाचा व्याप असेल असे गृहीत धरले तरी किमान आपण निरोप लिहून ठेऊन आपली प्रतिक्रिया कळवावी अशी व्यवस्था करा.आपत्ती काळात विसंवाद ठेऊ नका. ही सूचना. आहे.
आपला ,
अॅड.जीवनदत्त आरगडे,
अध्यक्ष, बार्शी शहर काँग्रेस कमिटी,
मोबाईल – 09545152888, 09699520711,







