जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शिवकॉलनी स्टॉपजवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेनजिक असणारे एटीएम गॅस कटरने फोडून १४ लाख रुपयांची रोकड लांबविली आहे. चोरट्यांच्या या उद्योगाने पोलीस खाते खडबडून जागे झाले आहे. ही घटना आज (दि.१२) सकाळी परिसरातील नागरिकांमुळे उघडकीस आली.
याबाबत वृत्त असे की, सकाळी हे एटीएम सेंटर तोडले असल्याचे या परिसरातील रहिवाशाच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती शाखा व्यवस्थापक दिवेश चौधरी यांना दिली. त्यांनी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून आता तपास सुरू करण्यात आला आहे. बँकेतील सीसीटिव्हीची पाहणी केली असता यात तीन चोरटे असल्याचे निष्पन्न झाले असून आता याच दिशेने पोलिसांचा तपास सुरू करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी घटनास्थळी भेट दिली असून जिल्हा पेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.







