जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – खासगी वादाचा वचपा काढण्यासाठी एका तरुणाने दुसऱ्याला ठार मारण्यासाठी शहरात पिस्तूल, काडतूस मागवले असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी संबंधित तरुणासह पिस्तूल आणून देणाऱ्यालाही अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले आहेत. कार्तिक राजू सुरवाडे (वय १९, रा. समतानगर) व राहुल घेवरचंद बनबेरु (वय ३०, रा. रायसोनीनगर) असे अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.
शहरात नाश्त्याची गाडी चालवणारा राहूल व महाविद्यालयीन विद्यार्थी असलेला कार्तिक, हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. दरम्यान, दोन-तीन महिन्यांपासून राहुल हा काहीसा तणावात होता. त्याचे शहरातील एका दुसऱ्या तरुणाशी वाद होते. या वादाचा वचपा काढण्याच्या तयारीत तो होता. त्यासाठी त्याने कार्तिकची मदत घेण्याचे ठरवले. संबंधित तरुणाच्या थेट ‘डोक्यात गोळी मारुन त्याला ठार करायचे’ असे दोघांमध्ये ठरले. परंतू, त्यांच्याकडे गोळी मारण्यासाठी पिस्तूल देखील नव्हते. अशात कार्तिकने मध्यप्रदेशातील उमर्टी येथुन पिस्तूल आणण्याची योजना आखली. त्यासाठी राहुलने त्याला १२ हजार रुपये दिले. यानंतर दोन दिवसांपूर्वीच कार्तिक पिस्तूल व काडतूस घेऊन जळगावात दाखल झाला होता. यातील पिस्तूल राहुलकडे तर काडतूस कार्तिकच्या घरी ठेवलेले होते.
दरम्यान, या दोघांमध्ये शिजत असलेला कट आणखी काही जणांमध्ये चर्चेस आला होता. राहुलच्या हालचाली देखील तशाच झाल्या होत्या. ठरल्यानुसार येणाऱ्या एक-दोन दिवसात राहुल व कार्तिक संबधित तरुणावर गोळीबार करणार, असे जवळपास निश्चित झाले होते. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे विजय शामराव पाटील यांना मिळाली होती.
त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, प्रदीप पाटील, दादाभाऊ पाटील, सुनील दामोदरे, विजय शामराव पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, पंकज शिंदे यांनी वेगवेगळी दोन पथके तयार करुन दोन दिवसांपासून राहुल व कार्तिक यांच्यावर नजर ठेऊन होते. संपुर्ण खात्री झाल्यानंतर सोमवारी दुपारी या दोघांना मानराज पार्क परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पिस्तूल मागवल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल व काडतूस जप्त करण्यात आले आहेत. या दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.







