बुलेटप्रुफ जॅकेटच्या कंपनीत कामाला असलेल्या नक्षलवाद्याला पोलिसांनी केली अटक

nakshalwadi

सुरत – गुजरातच्या सूरत जिल्ह्यात मांगरोलमध्ये टेक्सटाईल पार्कमधील एका कंपनीत कुख्यात नक्षलवादी ओळख लपवून तीन वर्षांपासून काम करत होता. या फॅक्टरीमध्ये सैन्यदलातील जवानांसाठी बुलेटप्रुफ जॅकेट, हेल्मेट, पॅराशूटचे कापड बनवण्यात येते. संरक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या फॅक्टरीत नक्षलवादी तीन वर्षांपासून काम करत असल्याचे उघड झाल्याने अशा फॅक्टरीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. झारखेड पोलिसांनी या नक्षलवाद्याला अटक केली आहे.

झारखंडच्या नोडीया बाजार परिसरातील या नक्षलवाद्यावर बॉम्बस्फोट घडवणे, शस्त्रास्त्रे बाळगणे आणि हत्येचे असे एकूण 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे नाव गुड्डू सिंह असून तो 2013 मध्ये गुजरातमध्ये आला होता. झारखंड पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, ओळख लपवून संरक्षण क्षेत्राशी संबंधीत फॅक्टरीत काम करत असल्याने तो पोलिसांना गुंगारा देत होता.

गुड्डू सिंहने वापीतील कुसुमनगर कॉर्पोरेट कंपनीतून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने कपड्यांच्या गुणवत्तेवर लक्ष देण्याचे काम सुरू केले. त्यानंतर तो मांगलोरला आला. येथील सैन्य दलातील जवानांसाठी बनवण्यात येणाऱ्या कपड्यांच्या गुणवत्तेवर देखेरेख ठेवण्याचे काम तो करत होता. गेल्या अनेक वर्षांपासून झारखंड पोलीस त्याचा शोध घेत होते.

गुड्डू सिंह (36) पत्नी आणि दोन मुलांसह कोसंबा पोलीस ठाण्याजवळच राहत होता. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने गुजरातमधूनच बनावट आधार कार्डही बनवले होते. त्यावर त्याने आपले नाव परिमल प्रताप सिंह असे नोंदवले आहे. याच नावाने तो वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत होता. संरक्षण क्षेत्राशी संबंधित या कंपनीत तो गेल्या तीन वर्षांपासून कामाला होता. झारखंड पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी गुड्डू सिंहला अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यात करण्यात येत आहे.

कुख्यात नक्षलवाद्याला शोधण्यात झारखंड पोलिसांना यश आले आहे. त्याच्यावर 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. संरक्षण क्षेत्राशी संबधित महत्त्वाच्या फॅक्टरीत कुख्यात नक्षलवादी तीन वर्षे काम करत असल्याने अशा फॅक्टरीच्या संरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here