नवी दिल्ली – करोना संक्रमणकाळातच राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांत आणखीन एका अतिशय धोकादायक विषाणूनं आपलं बस्तान बसवल्याचं समोर आलंय. ‘बर्ड ब्लू’मुळे राजस्थानातील जवळपास २५० तर मध्य प्रदेशात ५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय. तसंच केरळमध्येही १२००० बदकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर संबंधित राज्यांत अधिकाऱ्यांकडून ‘बर्ड फ्लू’चा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतर, झारखंड आणि हिमाचल प्रदेशातही या विषाणूसंबंधी अलर्ट जारी करण्यात आलाय. केंद्र सरकारनंही या घटनेची नोंद घेतलीय.
मध्य प्रदेशातही इंदोरमध्ये जवळपास ५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. इंदोरमध्येही तीन दिवसांपूर्वी ५० कावळे मृतावस्थेत आढळले. हे कावळे बर्ड फ्लूनं संक्रमित असल्याचं समोर आलंय. या कावळ्यांत H5N8 विषाणू आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागानं थंडी, ताप, सर्दी-खोकला अशी लक्षणं असणाऱ्या व्यक्तींनाही ट्रेस करण्याची धडक मोहीम सुरू केलीय.
जयपूर, झालावाड यांसहीत इतर शहरांत आढळलेल्या मृत कावळ्यांत धोकादायक अशा बर्ड ब्लू विषाणू आढळल्याचं सांगण्यात आलंय. २५ डिसेंबरपासून एकाच वेळी अनेक मृत कावळे आढळण्यास सुरूवात झाली होती. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय सुरू करण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
जयपूरच्या प्रसिद्ध जल महलमध्ये रविवारी सात कावळे मृतावस्थेत आढळले होते. याचसोबत राज्यात मृत कावळ्यांची संख्या २५२ वर पोहचलीय. याअगोदर झालावाडमध्ये १००, बारामध्ये ७२, कोटामध्ये ४७, पालीमध्ये १९ आणि जयपूर-जोधपूरमध्ये प्रत्येकी ७ कावळे मृतावस्थेत आढळले.
केरळमध्ये अलापुज्झा आणि कोट्टायम जिल्ह्यांत बर्ड फ्लूची पृष्टी करण्यात आलीय. गेल्या आठवड्यात जवळपास १२ हजार बदके अचानक मृतावस्थेत आढळली होती. यापैंकी काही नमुने भोपाळमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. या पक्ष्यांमध्येही H5N8 विषाणू आढळल्याचं समोर आलंय. यानंतर, संसर्ग टाळण्यासाठी राज्यात जवळपास ३६ हजार बदकांना ठार केलं जाऊ शकतं, अशी माहिती प्रशासनाकडून मिळतेय.
बर्ड फ्लू नावानं ओळखला जाणारा हा आजार एवियन एन्फ्लुएन्जा व्हायरस H5N1 मुळे होतो. त्यामुळे या विषाणूच्या संपर्कात आल्यास पक्ष्यांचा अचानक मृत्यू होतो. हा आजार मनुष्यासाठीही धोकादायक आहे. श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या, ताप, सर्दी, स्नायूदुखी, ओटीपोटात दुखणं आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या या आजारात जाणवू शकतात.







