मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – ब्रिटनमधील नवीन करोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने परदेशातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांसाठी नियमावली जारी केलेली आहे. त्यानुसार क्वारंटाइन व करोना चाचणी बंधनकारक असताना त्या नियमांचे पालन न केल्याने अभिनेता अरबाज खान, सोहेल खान आणि अरबाजचा मुलगा निर्वाण खान हे तिघे गोत्यात आले आहेत.
परदेशातून मुंबईत व महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी सात दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक आहे. असे असताना दुबईतून परतल्यानंतर क्वारंटाइन न राहता संबंधित यंत्रणांची दिशाभूल करून अरबाज खान, सोहेल खान आणि निर्वाण खान हे तिघे आपल्या घरी गेल्याचे उघड होताच पालिकेने त्याची गंभीर दखल घेतली आहे. पालिकेकडून याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून त्यावरून खार पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरबाज, सोहेल व निर्वाण हे तिघे २५ डिसेंबर रोजी दुबई येथून मुंबईत परतले. त्यांना हॉटेलमध्ये विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार आम्ही ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये राहणार आहोत, असे तिघेही म्हणाले होते. मात्र, प्रत्यक्षात तिघेही थेट घरी गेले. त्यामुळे कोविड नियम मोडल्याप्रकरणी आम्ही तक्रार नोंदवली आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले. या तिघांनाही आता भायखळा येथील विलगीकरण केंद्रात ठेवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.







