मॉस्को (रशिया) : गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण झाली आणि त्यातील पाच लाखांहून अधिकांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे या व्हायरसला आवर घालणारी लस कधी येणार याकडे जगभरातील सर्वांचे लक्ष्य लागून राहिले होते. मात्र आता लवकरच कोरोनाचा कायमचा बंदोबस्त होईल, अशी माहिती पुढे आली आहे.
जागतिक महासत्ता अशी ओळख असणाऱ्या रशियाने कोरोनावर रामबाण लस तयार केली आहे. सेचेनोव फर्स्ट मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना यामध्ये यश आलं आहे. रशियन शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या लसीच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन मेडिसिन अॅण्ड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वादिम तारासोव यांनी दिली. त्यामुळे ही जगातील पहिली कोरोना लस शोधून काढण्याचा मान आता रशियाला प्राप्त झाला आहे.
१८ जूनपासून रशियाच्या गमलेई इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीद्वारे तयार केलेल्या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या होत्या. त्यानंतर रविवारी सेचेनोव विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावर प्रभावी अशी जगातील पहिली लस तयार केली आहे.







