जळगाव (संपादक सुनील पाटील) – शासनाने लग्नसमारंभामध्ये फक्त 50 लोकांची मर्यादा घातल्याने लग्नसराईचे गणितच बदलले आहे. लग्न समारंभातील हॉलच्या सजावटीपासून हजारो लोकांचे जेवण, हळद, स्वागत समारंभ अशा विविध कार्यक्रमांचा खर्च कमी झाला आहे. परिणामी, या खर्चातील बचतीचे रुपांतर आता सोन्यामधील गुंतवणुकीच्या स्वरूपात समोर येऊ लागले आहे.
जळगाव ही सुवर्णनगरी म्हणून ओळखली जाते. या सुवर्णनगरीतील सोने खरेदीकडे सर्वांचाच कल असतो. याबाबत जाणून घेण्यासाठी सराफ बाजारातील व्यावसायिकांशी बोलले असता, त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनचा फटका इतर क्षेत्रांप्रमाणेच सराफा बाजारालाही बसला आहे. सम-विषम पद्धतीने दुकान खुले राहत असल्याने ग्राहकांसह सराफ व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ग्राहक बाजारात आल्यानंतर दुकान बंद असल्याचे पाहून रिकाम्या हाताने परतत आहेत. त्यामुळे सरकारने सलग सहा दिवस दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी सराफांमधून केली जात आहे.
तूर्तास अनेक लग्नसमारंभ पुढे ढकलले जात असून 15 जुलैनंतर लग्न सराईचे मुहूर्त नाहीत. त्यामुळे थेट ऑक्टोबर महिन्यात लग्न समारंभांना सुरुवात होईल. त्यावेळी मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता सराफांनी व्यक्त केली आहे. जागतिक स्तरावर असलेल्या आर्थिक मंदीमुळे गुंतवणूकदारांचा मोर्चा अद्याप सोन्याच्या दिशेने दिसत आहे.
शासनाने लग्नसमारंभावर आणलेल्या निर्बंधांमुळे जेमतेम खर्चात लग्नसोहळे पार पडत आहेत. त्यातून वाचलेला पैसा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवला जात असल्याचे निदर्शनास येते.







