कुऱ्हे पानाचे पुन्हा कोरोनामुक्त

गिरीश पवार – (कुऱ्हे पानाचे) – आरोग्य विभागाने आरोग्याची काळजी घेतली तर गल्ली, गावातील लोक, मित्रमंडळी व नातेवाईकांनी वेळोवेळी फोनवर संपर्क साधून मानसिक आधार दिल्याने जे आमचे मानसिक खच्चीकरण झाले होते ते दूर झाले. आम्हाला धीर दिल्याने आमच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनावर मात करण्यास मदत झाली. त्यामुळे आमचे कुटुंब आपल्या सर्वांचे ऋणात राहिल. अश्याच प्रकारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला योग्य उपचारासह त्याच्या कुटुंबाला मानसिक धीर दिल्याने निश्चितच कोरोनावर मात करता येईल अशी भावना डी के पाटील यांनी व्यक्त केल्या.
गावात ३ जुलै रोजी पाटील वाडा परिसरात २९ वर्षीय कोरोना रुग्ण आढळून आला होता. रुग्णाच्या आई, वडील व भाऊ तिघांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने सोमवारी (दि.६) त्यांना भुसावळ येथील नवोदय कोविड सेंटरमधून घरी सोडण्यात आले होते. तर रुग्णावर उपचार करून त्याची प्रकृती उत्तम असल्याने त्याला सर्दी, खोकला, ताप अश्या कोणत्याही प्रकारचे लक्षण नसल्याने त्याचे कोविड अहवाल मागवण्यात आले. तरी तो अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला रविवार (दि.१२) रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटर मधून घरी सोडण्यात आले. गावातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे व ग्राम पंचायत प्रशासनाच्या उपाययोजनामुळे गावात कोरोनाने शिरकाव केला नव्हता त्यामुळे गाव कोरोनामुक्त होते. परंतु दि.३ जुलै रोजी गावात कोरोनाने आपले खाते उघडले खरे परंतु सद्यस्थितीत तो ही रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने, कुऱ्हे पानाचे गाव पुन्हा कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, कोरोनामुक्त रुग्णाचे गावात पुष्पवृष्टी व औक्षण करुन स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here