नायगाव उड्डाणपुलाचे पाच वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लावावे – अनिल गलगली

anil-galgali

मुंबई (विशेष प्रतिनिधी)– नायगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणा-या नायगाव उड्डाणपूलाचे काम गेल्या 5 वर्षांपासून रखडलेले आहे. रखडलेल्या नायगाव उड्डाणपूलाचे काम 31 मे 2021 पर्यंत पूर्ण होण्यासाठी एमएमआरडीए तर्फे कंत्राटदारांला मुदतवाढ दिली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते #अनिलगलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे #नायगाव उड्डाणपूलाबाबत विविध माहिती विचारली होती. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांस कळविले की दिनांक 20 डिसेंबर 2013 रोजी उड्डाणपूलाचे काम सुरु झाले होते आणि 20 जून 2016 रोजी पूर्ण करण्याची अपेक्षित तारीख होती. 1.29 किलोमीटरचा नायगाव उड्डाणपूल असून 85.12 कोटी अपेक्षित खर्च आहे. अजूनपर्यंत खर्चात वाढ झाली नसून 5 वर्षे 11 दिवस अशी एकूण दिलेली मुदतवाढ आहे. दिनांक 31 मे 2021 या वाढीव मुदतीत काम पूर्ण करण्याची तारीख देण्यात आली आहे.

नायगाव उड्डाणपूलांमुळे प्रामुख्याने नायगाव पश्चिम, नायगाव पूर्व व वसई तालुक्यातील उमेळे, #ज्यूचंद्र इत्यादी भागातील स्थानिकांना सदर प्रकल्पाचा फायदा होईल. #वसई पश्चिम व #उमेळे गावातील स्थानिकांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 पर्यंत अंदाजे 10 किलोमीटर अंतर कमी होऊन वळसा वाचेल.

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर ए राजीव यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने नागरिकांचा त्रास वाढत आहे आणि भविष्यात प्रकल्पाच्या किंमतीत वाढ न होण्याची दक्षता घेण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here