शेतीच्या वादातून दगडाने ठेचून खून

murder

औसा – शेतात असलेले कांदे काढणीवरून झालेल्या वादातून शेतकऱ्यानेच एका शेतकऱ्यांचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडलेली आहे. औसा तालुक्यातील जायफळ येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून गुरुवारी ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.

जायफळ (ता. औसा) येथील मयत धनराज साधू भोंग (वय 50) आणि आरोपी महादेव गुंडीबा माने हे दोघे जायफळ गावचे रहिवाशी आहेत. बुधवारी शेत शेजारी असलेले हे दोघेही नेहमीप्रमाणे रात्री आपआपल्या शेतात गेले होते.दरम्यान शेतात असलेले कांदे काढणीवरून या दोघामध्ये रात्री 11च्या सुमारास वाद सुरू झाला आणि हा वाद हाणामारीपर्यंत गेल्यानंतर रागाच्या भरात दोघांनी एकमेकांना मारहाण केली.

या मारहाणीत धनराज भोंग हे जखमी होऊन जमिनीवर पडल्यानंतर आरोपी महादेव माने याने हा परत उठला तर आपल्याला सोडणार नाही. असा विचार करून जखमी अवस्थेत पडलेल्या धनराज भोंग यांच्या तोंडावर क्रूरतेने दगडाने ठेचून एकामागून एक वार केले. यात याचा जागीच मृत्यू झाला.सदरील घटना रात्रीच्या वेळी झाल्याने आजूबाजूला कोणीही नव्हते. त्यामुळे घडलेली ही घटनी सकाळी उघडकीस आली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारच्या पहाटे 4 पर्यंतच्या कालावधीत घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

सदर घटनेची फिर्याद मयताचे चुलत भाऊ भैरु भोंग यांनी दिल्यावरून भादा पोलिसांनी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी महादेव कोंडीबा माने याला गजाआड केले आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप भारती, सूर्यकांत गिरी आणि दिलीपसिंग चव्हाण आदी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here