वर्‍हाडाचा टेम्पो 300 फूट दरीत कोसळला

satara-accident

सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – सातारा येथून वर्‍हाड घेऊन निघालेला भरधाव टेम्पो 300 फूट दरीत कोसळल्याची घटना आज सायंकाळी पोलादपूरच्या कुडपणजवळ घडली. या दुर्घटनेत तीनजण ठार झाले असून 65 प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती वाऱयासारखी पसरताच पोलीस, महसूल विभाग तसेच परिसरातील गावकऱयांनी घटनास्थळावर धाव घेत मदतकार्य केले. त्यामुळे जखमींवर वेळीच उपचार करता आले. अवेळी कोसळत असलेल्या पावसाने रस्ता निसरडा झाल्याने हा अपघात घडला.

खेडमधील खवटी गावातील एका तरुणाचे सातारा जिल्ह्यातील कोंडुशी गावात लग्न होते. सोहळा आटपून गावकरी टेम्पोने कुडपणमार्गे खेडला परतत होते. कुडपण, धनगरवाडी येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा टेम्पो आला असता चालकाचा ताबा सुटला आणि ही भरधाव गाडी निसरड्या साईडपट्टीवरून थेट 300 फूट दरीत कोसळली.अचानक घडलेल्या या दुर्घटनेने एकच हल्लकल्लोळ झाला. अनेकजण आजूबाजूला फेकले गेले. यात विठ्ठल झोरे (65), तुकाराम झोरे (40), भावेश होगाडे (23) या तीन वर्‍हाडींचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. पोलीस, महसूल विभाग, आरोग्य पथक, साळुंखे ट्रेकर्स तसेच खेडमधील मदत संस्थेचे पदाधिकारीही अपघातस्थळी दाखल झाले. दोरखंड बांधून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेने सर्वांना महाड व पोलादपूर येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here