आमदार आपल्या दारी अभियान लवकरच बार्शी शहरात राबविणार – आमदार राजेंद्र राऊत

MLA-Rajendra-raut

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी नगर परिषदेमध्ये, बार्शी शहरांमध्ये सुरू असलेली विविध विकास कामे व रखडलेली, प्रलंबित विकासकामे याबाबतची माहिती घेण्यासाठी नगर परिषदेचे सर्व खातेप्रमुख, नगरसेवक, इंजिनिअर व प्रमुख ठेकेदार यांची संयुक्त आढावा बैठक घेतली.

या बैठकीत आमदार राजेंद्र राऊत यांनी विकास कामांना गती देवून ती कामे लवकर पूर्ण करण्यासाठी सुचना दिल्या.
तसेच बार्शीकर नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, नागरिकांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, कोरोना कालावधीमुळे रखडलेली व अपूर्ण कामांमुळे बार्शीकर नागरिकांना झालेल्या त्रासामुळे आम्ही त्यांची माफी मागतो. मी स्वतः बार्शी शहरात लवकरच आमदार आपल्या दारी अभियान राबविणार असून नागरिकांचे प्रश्न, अडी-अडचणी, मूलभूत सुविधा यांबद्दल जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, बार्शी शहर व तालुक्याची विकास कामे करत असताना कायद्याच्या चौकटीत राहूनच बार्शी नगरपरिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली व सध्या सुरू आहेत. परंतु बार्शीतील राजकीय मनोरूग्ण, सतत फेसबुकवर लाईव्ह येणारी विघ्नसंतोषी, प्रापंचिक अपयशी, व्यावसायिक अपयशी, लायकी नसलेली लोकं एखाद-दुस-या टेक्निकल मुद्द्यावर तक्रारी करून, विकास कामांना खीळ बसवून नागरिकांना वेठीस धरत आहेत. त्यांनी व्यक्तीगत मला जरूर विरोध करावा, परंतु विकास कामांना विरोध करू नये.

माझे अशा लोकांना जाहीर खुले आव्हान आहे की, माझ्या सहकाऱ्यांसोबत काम करत असताना वरील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बेकायदेशीर कामे केली म्हणून केलेले आरोप पुराव्यानिशी सिद्ध केले तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. पण हे आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनी सगळ्यांनी बार्शी सोडून जावे.

बैठकीस नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी सौ.अमिता दगडे पाटील मॅडम, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, नगरसेवक प्रशांत कथले, बापूसाहेब वाणी बाळासाहेब लांडे, भारत पवार सर, पक्षनेते विजय नाना राऊत, गटनेते दिपक राऊत, विजय चव्हाण, बापूसाहेब जाधव, ॲड‌. महेश जगताप, कय्युम पटेल, भैय्या बारंगुळे, अमोल चव्हाण, पाचू उघडे, काकासाहेब फुरडे, रितेश वाघमारे, मदन गव्हाणे, गणेश चव्हाण व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here