बंगळुरु – आपल्या असंख्य प्रभावशाली व्यक्तींशी ओळख असल्याचे सांगत एका ज्योतिषाने निवृत्त न्यायमूर्तींना 8 कोटींचा गंडा घातला आहे. बंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी झालेल्या तक्रारीनंतर या ज्योतिष्याला अटक केली आहे. चांगलं पद मिळवून देतो असं सांगत त्याने आपल्याला चुना लावल्याचं निवृत्त न्यायमूर्तींनी तक्रारीत म्हटलं आहे. युवराज रामदास (वय वर्ष 52) असं या ज्योतिषाचे नाव आहे.
माजी न्यायमूर्ती बी.एस.इंद्रकला (वय वर्ष 68) यांनी बंगळुरू पोलिसांकडे युवराजविरोधात तक्रार नोंदवली होती. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला होता. इंद्रकला यांना युवराजने त्याच्या ओळखीचा वापर करत सरकारी यंत्रणेमध्ये मोठ्या पदाची नोकरी लावून देतो असं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन देत त्याने जून 2018 ते नोव्हेंबर 2019 या काळामध्ये त्यांच्याकडून 8.27 कोटी रुपये उकळले होते.
इंद्रकला यांच्याशी युवराज याची ओळख एका निवृत्त पोलीस अधीक्षकाने घडवून आणली होती. 2017-2018 साली त्यांची ही भेट झाली होती. युवराजने इंद्रकला यांना आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी खोटं-खोटं भविष्य सांगायला सुरुवात केली. त्याने इंद्रकला यांना सांगितलं होतं की त्यांचा जन्म हा फार मोठ्या पदावर काम करण्यासाठी झाला आहे. युवराजने इंद्रकला यांना त्याचे बड्या व्यक्तींसोबतचे स्वत:चे फोटो दाखवून प्रभावित केलं. आपले अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्याची युवराजने इंद्रकला यांच्यापुढे थाप ठोकली होती.
इंद्रकला यांचा आपल्यावर विश्वास बसलाय हे कळाल्यानंतर युवराजने आणखी एक बंडल फेकली. त्याने म्हटले की केंद्रातील नेते इंद्रकला यांच्यासारख्या महिलेचा एका बड्या पदासाठी शोध घेत आहेत, मात्र या पदावर जाण्यासाठी या नेत्यांना पक्षनिधी द्यावा लागेल. त्याच्यावर विश्वास बसल्याने इंद्रकला यांनी त्याला पैसे देणं सुरू केलं.
इंद्रकला यांनी त्यांच्याकडे असलेली जागा विकून आणि मालकीहक्काची इमारत गहाण ठेवून 3.77 कोटी रुपये युवराजला दिले. त्यानंतरही युवराजने पुन्हा पैसे मागितले. यानंतर इंद्रकला यांनी कर्जाने पैसे घेत युवराजला 4.50 कोटी रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर युवराजने इंद्रकला यांच्याशी असलेला संपर्क तोडून टाकला. युवराजने आपल्याला सरकारी पद मिळवून दिलं नाही, पैसे घेतले आणि आता तो उत्तरही देत नाही हे इंद्रकला यांच्या उशिराने का होईना पण लक्षात आलं. यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.
इंद्रकला यांच्या तक्रारीनंतर बंगळुरू पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीच्या घरी छापा मारला. यावेळी त्यांना 26 लाखांची रोकड आणि 91 कोटी रुपयांचे युवराजच्या नावाने असलेले चेक सापडले. तपासादरम्यान युवराजविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचं पोलिसांना कळालं. मुंबईतील एका व्यावसायिकाला जमिनीचा वाद सोडवण्याच्या बदल्यात त्याने 10 कोटींचा गंडा घातला होता. या प्रकरणी युवराजने जून आणि डिसेंबर 2020 मध्ये अटकपूर्व जामीन मिळवला होता.
युवराजचे भाजप आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांसोबतचे फोटो पोलिसांना मिळाले आहेत. यामध्ये कर्नाटकच्या मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी उत्सुक आमदारांच्या फोटोंचाही समावेश आहे. या फोटोंमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासोबतचेही युवराजचे फोटो पोलिसांना मिळाले आहेत. या फोटोबाबत बोलताना सवदी म्हणाले की अनेक जण आपण पक्षाचा कार्यकर्ता किंवा संघटनेतील व्यक्ती असल्याचं सांगत आपल्यासोबत फोटो काढतात, यातील प्रत्येकाला आपण ओळखतोच असे नाही.







