भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्य प्रदेशमध्ये विधवा महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणातील बलात्कार पीडितेची ओळख फेसबुकवर व्हायरल करण्याचं संतापजनक कृत्य भाजपच्या महिला खासदाराने केलं आहे.
मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यात एका विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. गंभीर म्हणजे बलात्कारानंतर तिच्यावर लोखंडी रॉडनेही अत्याचार करण्यात आले. तिची प्रकृती नाजूक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपच्या खासदार रीती पाठक यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीचे फोटो त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकले. त्या फोटोवर त्यांनी पीडितेच्या नावासह तिच्यावर झालेल्या भीषण बलात्काराचा उल्लेख करत तिची ओळख सार्वजनिक केली. बरेच तास ती पोस्ट तशीच फेसबुकवर होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार, बलात्कार पीडितेची ओळख सार्वजनिक करता येत नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी पाठक यांची खरडपट्टी काढायला सुरुवात केली. पीडितेचं नाव व्हायरल करण्यापेक्षा आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळून तिला न्याय कसा देता येईल, त्याकडे लक्ष द्या असा शेराही नेटकऱ्यांनी मारला. पाठक यांनी त्यानंतर आपली पोस्ट डीलिट केली.







