नीलम गोऱ्हे, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर हरवल्या आहेत..शोधून देणाऱ्यांना ५०० रुपयांचे बक्षीस – तृप्ती देसाई

neelam-gorhe-and-supriya-sule

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या तरूणीने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात आता मनसे नेते आणि संतोष धुरी आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी गौप्यस्फोट केल्याने नवा ट्विस्ट आला आहे. मात्र यावर ठाकरे सरकारमधील एकाही महिला नेत्याची प्रतिक्रिया आली नाही. याच पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी निशाणा साधला आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे, ठाकरे सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर हरवल्या आहेत कृपया कुणाला दिसल्यास सांगावं. माहिती देणाऱ्यास पाचशे रुपयांचं रोख बक्षीस, अशी उपरोधिक टीका तृप्ती देसाई यांनी केली आहे.

आपण महाराष्ट्रात असाल तर नक्कीच या प्रकरणावर जाहीरपणे बोला, सध्या तुमची गरज रेणू शर्माला आहे, असेही तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. हाथरस प्रकरणात तिघीही खूपच आक्रमकपणे पीडित मुलीला न्याय मिळविण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या. परंतु दुर्दैव असे आहे की आपल्या राज्यात जर एखादी महिला तिच्यावर अत्याचार झाला आहे असं सांगत आहे. पोलिसात तक्रार करीत आहे पुरावे देत आहे तरी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत, असे देसाई म्हणाल्या. तरी तुम्ही तिघी कार्यरत असलेल्या पक्षाच्या, युतीच्या ‘महाविकास आघाडी सरकार’च्या मंत्रीमंडळात धनंजय मुंडे मंत्री आहेत. म्हणून ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटे’ अशी भूमिका तुम्ही या प्रकरणात घेत आहात असे सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. महिलांचे सबलीकरण यासाठी आवाज उठवत असताना आपल्या पक्षातील एखाद्या नेत्यावर आरोप झाले, तर त्याविषयी बोलायचे नाही अशी भूमिका जर तुमच्यासारख्या महिला नेत्या घ्यायला लागल्या तर महाराष्ट्रात महिला सबलीकरण होणे अशक्य आहे. आपण महाराष्ट्रात असाल तर नक्कीच या प्रकरणावर जाहीरपणे बोला, सध्या तुमची गरज रेणू शर्माला आहे’, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे माहिती देवून सहमतीने शरीरसंबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले असल्याचे कबुली दिल्यामुळे “एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली” असा संदेश जनतेमध्ये जात आहे, जो पुढील दृष्टीने चुकीचा आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या. रेणू शर्मांनी दिलेली तक्रार गंभीर स्वरुपाची असून, तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तसेच रेणू शर्मांविरोधात जर कोणी तक्रारी केल्या असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी पक्षाने तातडीने धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून मुंडे यांची हकालपट्टी करावी, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here