सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – जत तालुक्यातील शेगाव जवळ सोने विक्रीसाठी निघालेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून व बेदम मारहाण करीत सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. या प्रकरणी जत पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक उत्तम जाधव तसेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील पळसखेड येथील सोने व्यापारी बाळासाहेब वसंत सावंत हे बेळगाव हून चार किलो सोने घेऊन आपल्या चारचाकी गाडीतून नांदेड येथे सोने देण्यासाठी निघाले होते. काल (गुरुवार) रात्री दोनच्या सुमारास ते शेगाव जवळील माणेवस्ती येथे लघुशंकेसाठी गाडीतून उतरले. याचवेळी त्यांचा ओमनी गाडीतून पाठलाग करणाऱ्या चार आज्ञात दरोडेखोरांनी व्यापारी सावंत व त्यांच्या जोडीदारास पकडून बेदम मारहाण करून डोळ्यात चटणी टाकून त्यांच्याकडील सव्वा दोन कोटीचे चार किलो सोने लंपास केले. या प्रकरणी जत पोलिस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







