नवी दिल्ली – अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी ‘निधी समर्पण अभियान’ या मोहिमेस शुक्रवारपासून सुरूवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वत: ५ लाख १०० रुपयांची देणगी देऊन आजच्या दिवशी या मोहिमेस सुरूवात केली. श्री. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषद आणि स्वयंसेवक संघ यांचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्याकडे देणगी मागण्यासाठी पोहोचले होते.
अयोध्येत भव्य आणि आकर्षक असे प्रभू रामाचे मंदिर उभारण्यात येणार आहे. यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट यांच्या वतीने वेगवेगळ्या देणगीदारांकडून निधी जमा करण्यास आजपासून सुरूवात केली आहे. ही देणगी ‘निधी समर्पण अभियान’ या मोहिमेतून गोळा केली जात आहे. याच दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे या ट्रस्टने मागणी केली.
यानंतर रामनाथ कोविंद यांनी राम मंदिरासाठी ५ लाख १०० रूपयांची देणगी दिली. यावेळी त्यांनी या ट्रस्टकडे ५ लाख १०० रूपयांचा एक चेक सुपूर्द केला. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ११ लाख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ कोटी, मोरारी बापू ११ कोटी रूपयांची देणगी दिली आहे. याशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी श्री. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र निधी अभियानात भाग घेवून राम मंदिर उभारण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे विनायकराव देशमुख यांना १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.







