निवडणुक जाहीरनाम्यात उमेदवाराने चक्क दिले पाऊस पाडण्याचे आश्वासन

grampanchyat-election

शिरपूर (प्रतिनिधी) – निवडणुका म्हटलं की सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते निवडणुकांमध्ये जाहीरनाम्यातून रस्ते, वीज, पाणी, शासकीय योजना राबवण्याच्या संदर्भात मतदारांना विविध प्रकारची आश्वासने देतात परंतु पाथर्डी तालुक्यातील शिरापूर करडवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जय भोलेनाथ ग्राम विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरनाम्याद्वारे पाच वर्षांच्या कार्यकाळात जर एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर होमहवन करून पाऊस देखील पाडू, असे जाहीरनाम्यातून आश्वासन दिल्याने मतदारांना देखील डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

पाथर्डी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून प्रचार देखील आता शिगेला पोहोचला आहे. एकूण 75 ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या सुरू असून यामध्ये विविध पॅनल मंडळाकडून मतदारांना जाहीरनाम्याच्या माध्यमातून विविध आश्वासने दिली जात आहेत. रस्ते, वीज, पाणी, घरकुल, शौचालयासारखे विविध प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन देणारे जाहीरनामे अनेक गावांतून पाहण्यास मिळाले आहेत.

मात्र शिरापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या करडवाडी येथील जय भोलेनाथ ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या जाहीरनाम्यामध्ये पाच वर्षांच्या कार्यकाळात एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला तर गावांमध्ये दोन हरिनाम सप्ताह केली जातील त्याचबरोबर यज्ञ हवन करून वरूणअस्त्राचा सिद्ध प्रयोग करून संत नवनाथ व महादेवाच्या कृपेने होमहवन करून गावात पाऊस देखील पाडला जाईल, असे आश्वासन जाहीरनाम्या द्वारे वॉर्ड क्रमांक 1 मधील उमेदवार मनोज झुंबर कराड यांनी मतदारांना दिल्याने गावातील मतदारावर देखील डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here