शास्त्रीय संगीताचे अध्वर्यू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

gulam-mustafa-khan

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – शास्त्रीय संगीताचे अध्वर्यू, पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे रविवारी दुपारी वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. खान यांच्या स्नुषा नम्रता गुप्‍ता-खान यांनी सांगितले की, खान यांची प्रकृती बरी होती. मात्र, सकाळी त्यांना उलट्या झाल्या. त्यानंतर त्यांचा श्‍वासोच्छ्वास मंदावला. डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, ते येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.

उस्ताद खान यांना 2019 मध्ये ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता. त्यामुळे त्यांच्या शरीराची डावी बाजू लुळी पडली होती. प्रकृती ठीक असताना अचानक मृत्यूची बातमी ऐकून त्यांच्या कुटुंबीयांनाही धक्‍का बसल्याचे नम्रता गुप्‍ता-खान यांनी सांगितले. सायंकाळी सांताक्रूझ कब्रस्तान येथे खान यांचा दफनविधी करण्यात आला.

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 1991 मध्ये पद्मश्री किताबाने, 2006 मध्ये पद्मभूषण, तर 2018 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. 2003 मध्ये त्यांना भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वोच्च अशा संगीत नाटक अकादमी अ‍ॅवॉर्डने गौरविण्यात आले होते. उस्ताद खान यांच्या निधनामुळे सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्‍त केले आहे. खान यांच्या निधनामुळे एक महान शास्त्रीय संगीतकार आणि तितक्याच महान व्यक्‍तिमत्त्वाला आपण मुकलो, अशा भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्‍त केल्या. गानकोकिळा लता मंगेशकर, उस्ताद अमजद अली खाँ आणि संगीतकार ए. आर. रहमान यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here