भुसावळ (नरेश पाटील) – काल (दि-13) जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ शहरात उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्या दालनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत भुसावळ शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल यावर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच लॉकडाऊन असल्यामुळे कोरोना संशयीत रूग्णांचा शोध घेऊन त्यांचे तात्काळ स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे, तसेच कोरोनाबाधीतांचे अहवाल सुद्धा तात्काळ उपलब्ध होत असल्याने त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.
अहवाल लवकर प्राप्त होत असल्यामुळे रूग्णांवर उपचार करणे सोपे होत आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांचे लवकरात लवकर निदान करून त्यांना घरी कसे पाठवता येईल आणि रुग्णांची संख्या शून्यावर कशी आणता येईल यासंबंधी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.तसेच जिल्ह्यातील मृत्यूदर कमी झालेला असून कोरोनाने बरे होणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे.तसेच भुसावळ शहरातील लॉकडाऊन वाढणार नसून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. तरीही नागरिकांनी मास्क लावून दक्षता घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी आज व्यक्त केले आहेत.
ट्रामा केअर सेंटरला देखील जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली.आजच्या बैठकीला आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने,तहसीलदार दिपक धिवरे,उपजिल्ह्याधिकारी तथा भूमी संपादन अधिकारी किरण सावंत पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,नगराध्यक्ष रमण भोळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत,शहर पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे,तालुका पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार उपस्थित होते.







