पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोरोना आजाराची लस बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या लस निर्मात्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील प्लँटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सीरम इंस्टिट्यूटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीचा लस निर्मितीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर जवळील गोपाळ पट्टीत असणाऱ्या सीरमच्या प्लँटमधील नवीन इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलास दुपारी अडीच वाजता आगीची घटना समजली आणि तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून, अगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथं मे महिन्यापासून सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात.







