धरणगाव (प्रा.पी.एम.पाटील) – सरकारी मका खरेदी केंद्रावर दर दिवसाला बोटावर मोजण्याइतकेच नंबर होतात, त्यामुळे केंद्र वाढविण्याबाबत महात्मा फुले ब्रिगेडतर्फे धरणगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द करावी, ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी करून जागा नसल्याने, व्यापाऱ्यांना मका परस्पर विकाला आहे, अशा शेतकऱ्यांना फरकाची रक्कम शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार देण्यात यावी, शासनाने मका खरेदी इलेक्टॉनिक काट्याने लवकरात लवकर खरेदी करावे, खरेदी केंद्रावर होणारा काळाबाजार थांबवावा, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी जर व्यापाऱ्याला मका विकला असेल तर खाली झालेल्या जागेवर नोंदणी केलेल्या पुढील शेतकऱ्यांस घेण्यात यावे, दुसऱ्या शेतकऱ्यास न घेता नोंदणी केलेल्याच शेतकऱ्यालाच घ्यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा कोरोना महामारीमध्ये एकटा संकटाशी व आर्थिक तंगीशी दोन हात करीत आहे. आता ऐन पेरणीमध्ये, खते विकत घेण्यासाठी त्याला पैसा लागत असतो, त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.पत्रकावर महात्मा फुले ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नरेंद्र महाजन, उपतालुकाध्यक्ष जगदीश जगताप, प्रमोद माळी, भूषण महाजन, हेमंत माळी, पी.डी.पाटील, विशाल महाजन, लक्ष्मण पाटील, लक्ष्मण माळी, वाल्मिक माळी, मयुर महाजन, अतुल तायडे, वैभव पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.







