बेळगाव – कानडी पोलिसांना चुकवून गनिमी काव्याने बेळगावातील कोनेवाडी गावात भगवा ध्वज फडकावल्याप्रकरणी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्यासह 8 शिवसैनिकांवर अखेर बेळगावच्या काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांना बेळगावात प्रवेश करण्यासही स्थानिक प्रशासनाने बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेली दडपशाही आता कर्नाटक प्रशासनाकडून महाराष्ट्रातील नेत्यांवरही करण्यात येत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी बेळगाव महापालिकेसमोर काही कन्नड संघटनांकडून न्यायालयाने मान्यता न दिलेला कर्नाटक राज्याचा लाल पिवळा ध्वज बेकायदेशीररित्या कानडी पोलिसांच्या आशीर्वादाने उभारण्यात आला आहे. बेळगाव महापालिकेवर भगवा ध्वज फडकविण्याचा ठराव असतानाही हा बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज जाणीवपूर्वक फडकविण्यात आल्याने मराठी भाषिकांनी तो हटविण्यासाठी वारंवार बेळगाव प्रशासनाला निवेदने दिली. परंतु त्यांची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने अखेर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेने 21 जानेवारी रोजी भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी कोल्हापूरातून शिवसैनिक निघाले असता सर्वांना बेळगावात येण्यापासून कानडी पोलिसांनी रोखले होते.
बेळगाव महानगरपालिकेवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी कर्नाटक सीमेवर लागून असलेल्या महाराष्ट्रातील शिनोळी, ता.चंदगड येथे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आंदोलन करत सीमाभागात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मोठ्या संख्येने असलेल्या कानडी पोलिसांना चकवा देत दुपारी गनिमी काव्याने बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी या गावात जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार, प्रा.सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, प्रभाकर खांडेकर आदी शिवसैनिकांनी भगवा ध्वज फडकावत ‘बेळगाव आमच्या हक्काचे… बेळगाव, निपाणी, बिदर,भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी घोषणाबाजी केली होती.







