पुणे पोलिसांच्या ‘भरोसा सेल’ने दोन वर्षापासून बेवारस फिरणाऱ्या वृध्द महिलेची घडविली कुटुंबाशी भेट

bharosa-sell-pune-police

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पोलिसांनी शहरातल्या फुटपाथवर वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ महिला नागरिकाची २ वर्षानंतर कुटुंबीयांशी भेट घडवून आणल्याची अनोखी घटना पुणे शहरात अनुभवायला मिळाली आहे. पुणे पोलिसांच्या ‘भरोसा सेल’ने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाकडील पोलीस अंमलदार हे शहरात एकटे-दुकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना भेटी देत होते. त्यावेळी त्यांच्या एका परिचिताने त्यांना शनिवार पेठेतील वर्तक गार्डन समोरच्या रस्त्याच्या कडेला एका दुकानाच्या कठड्यावर एक वृद्ध महिला २ ते ३ दिवसांपासून थकलेल्या आणि भुकेलेल्या अवस्थेत बसून असल्याची माहिती दिली. या माहितीवरून पोलीस नाईक सोनवलकर यांनी संतोष खाटपे यांच्याशी संपर्क करत या महिलेची त्यांच्याशी भेट घडवून आणली. या वेळी, पोलिसांनी त्यांची विचारपूस करत माहिती घेतली. त्यांचे नाव विमल निवृत्ती राऊत आणि वय ७५ वर्षे असल्याचे समजले. तसेच, त्यांना ४ मुली, ४ जावई आणि १० नातवंडे असा मोठा परिवार असून ते सर्व सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणी राहवयास आहेत, अशी माहिती मिळाली.

गेल्या दोन वर्षांपासून माझ्या मुली, जावई व नातवंडांनी माझा सांभाळ करण्याचे सोडून दिले. आपल्याला रस्त्यावर सोडून देण्यात आले आहे, असे त्या महिलेचे म्हणणे होते. तेव्हापासून आपण शनिवार पेठ, पुणे परिसरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्याचे कडेला राहून, मिळेल तसे अन्न खाऊन पोट भरत आहे, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, आता आपले खूपच हाल होत आहेत. आपल्या मुली व नातवंडांसोबत राहायचे आहे. तुम्ही मला माझ्या कुटुंबाची भेट घडवून द्या, अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली. तसेच, मुली व नातवंडे कोठे राहतात याबाबत माहितीही दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ज्येष्ठ महिलेच्या मुलींचे, नातवंडांचे पत्ते तसेच, मोबाईल नंबर मिळवून त्यांना भरोसा सेल- ज्येष्ठ नागरिक कक्षात बोलावून घेतले.

ज्येष्ठ महिलेच्या नातेवाईकांना पोलिसांनी कायद्याची जरब दाखविली. ज्येष्ठ नागरिकांना वाऱ्यावर सोडल्यास व त्यांचा परित्याग केल्यास कायदेशीर गुन्हा दाखल होतो व आपण शिक्षेस पात्र होता, याची जाणीव करून दिली. तसेच, योग्य ते समुपदेशन केले. ज्येष्ठ महिलेच्या सर्व मुली, जावई, नातवंडे यांनी आपण भविष्यात त्यांचा योग्य प्रकारे सांभाळ करू; तसेच, भविष्यात कधीही वाऱ्यावर एकटे सोडणार नाही, मानसिक व शारिरीक त्रास होऊ देणार नाही, भविष्यात त्यांच्या उदरनिर्वाहाची व औषधोपचाराची व्यवस्थित काळजी घेऊ, अशी ग्वाही दिली. या सर्वांनी ज्येष्ठ महिलेची माफी मागितली. त्यानंतर विमल राऊत यांना सुमारे २ वर्षानंतर त्यांची मुलगी व जावई साताऱ्यामधील मालवडीला घेऊन गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here