पगार न दिल्याच्या रागात, ड्रायव्हरने पेटवल्या ५ लक्झरी बसेस

travel-bus-in-fire

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – पगार न दिल्याने एका ड्रायव्हरने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अजय रामपाल सारस्वत असे आरोपीचे नाव आहे.

कोरोना काळातील १० दिवसाच्या कामाचे पगार आणि गोवामध्ये झालेला अपघात, यावरून ड्रायव्हर अजय रामपाल सारस्वत आणि मालक यांच्यात तक्रार झाली. याचा बदला घेण्याचा निश्चिय ड्रायव्हर अजयने घेतला. त्याने २१ डिसेंबर २०२० रोजी सिटी वजन काट्याजवळील पार्किंगमध्ये लावलेल्या ३ बसमध्ये आग लावली. त्यानंतर त्याने २१ जानेवारीला एसके रिसार्टच्या शेजारी असलेल्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २ बस आणि १ कार पेटवली.

पाच लक्झरी बसेस आगीत जळून खाक झाल्या होत्या. सुरुवातीच्या चौकशीत ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तेव्हा पोलिसांनी अधिक खोलवर तपास करत ड्रायव्हर अजय रामपाल सारस्वत याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची सखोल चौकशी केली असता त्यानेच बसेसला आग लावल्याची कबुली दिली. पगार न दिल्याने पाच बसेसला आग लावल्याची कबुली ड्रायव्हरने दिली.

अजय सारस्वतने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, या पाचही बसेसची किंमत सुमारे ३ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. या पाचही बसेसचा विमा उतरविण्यात आलेला नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट येले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here