लालू यादव यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करणार

laluprasad-yadav

नवी दिल्ली – बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना तब्येत ढासळल्यामुळे दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्याची तयारी सुरू आहे. भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरल्यामुळे लालू रांचीच्या तुरुंगात होते. तब्येत ढासळल्यामुळे त्यांना रांचीच्या रिम्समध्ये दाखल केले होते. मात्र अपेक्षित सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्याची तयारी सुरू आहे.

रिम्सने आठ डॉक्टरांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीचा आढावा घेऊन अहवाल देणार आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर लालू प्रसाद यादव यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल केले जाण्याची शक्यता आहे.

डिसेंबर महिन्यातच रांची तुरुंगाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश प्रसाद यांनी लालू प्रसाद यादव यांच्या किडण्या (मूत्रपिंड) २५ टक्के क्षमतेने कार्यरत असल्याचा वैद्यकीय अहवाल दिला होता. यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी उपचार सुरू होते. मात्र तब्येत आणखी खालावल्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या घरच्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच लालू प्रसाद यादव यांची भेट घेऊन त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यासाठी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू झाले.

लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याची माहिती मिळताच त्यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, मोठी मुलगी मिसा भारती, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मुलगा तेज प्रताप यादव हे सर्व जण विमानाने रांचीत दाखल झाले. तेजस्वी यादव यांनी वडिलांची भेट घेतली. नंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी तेजस्वी यादव यांनी चर्चा केली. यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीचा आढावा घेऊन अहवाल देण्यासाठी डॉक्टरांची समिती स्थापन झाली. डॉक्टरांच्या समितीने एम्समध्ये दाखल करण्यासाठी अनुकूल अहवाल दिला तर एअर अँब्युलन्सने लालू प्रसाद यादव यांना दिल्लीला नेले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here