मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्यात भाजपचे सरकार असताना पक्ष प्रवेश करण्यासाठी आपल्याला 100 कोटींची ऑफर देण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीच ही ऑफर आपल्याला दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माझाही समावेश होता. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रीपद देऊ. तसेच तुम्हाला निवडून आणण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च केले जातील, असे आपल्याला सांगण्यात आले होते. पण ही ऑफर आपण नाकारली व भविष्यातही नाकारतच राहू, असे शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी कॉँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्यासाठी फडणवीस आणि पाटील यांनी अनेक माध्यमातून आपल्याशी संपर्क केला. पश्चिम महाराष्ट्रात तुमच्यासारख्या प्रमुख चेहरा पक्षामध्ये हवा आहे, असे सांगत वारंवार त्यांनी प्रयत्न केले, असे शिंदे म्हणाले.







