वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी गृहविभागाद्वारे प्रथमच ‘जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे. दि.२६ जानेवारी २०२१ पासून येरवडा कारागृह पर्यटनासाठी खुले असेल. या प्रकल्पाचे उद्घाटन मंगळवारी २६ जानेवारी रोजी दुपारी १२.०० वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
भारतीय इतिहासामध्ये महाराष्ट्रातील कारागृहांना अनन्य स्थान आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात तसेच इतर कारागृहांतही जसे की ठाणे, नाशिक, धुळे व रत्नागिरी येथे कैद करुन ठेवले होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस या थोर नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात कैद करुन ठेवले होते. या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणे स्मारक म्हणून जतन करण्यात आलेली आहेत व ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या थोर नेत्यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण देत राहतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रसिध्द असा पुणे करार झाला तो याच येरवडा कारागृहात गांधी यार्ड असलेल्या आंब्याच्या झाडाखाली झाला. त्या झाडाची सुध्दा योग्य प्रकारे देखभाल करण्यात येत आहे. इ.स. 1899 मध्ये चाफेकर बंधूंना येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली. तसेच जनरल वैद्य यांच्या हत्येप्रकरणी कुप्रसिध्द जिंदा व सुखा यांनासुध्दा येरवडा कारागृहातील वधस्तंभावर फाशी देण्यात आली आहे. २६ नोव्हेंबर २००८ ला रोजीच्या मुंबई हल्ल्यातील कुप्रसिध्द अतिरेकी अजमल कसाबलासुध्दा याच कारागृहात फाशी देण्यात आली.







